Satara News: बर्गेवाडीनजीक धोम डावा कालवा फुटला, हजारो लिटर पाणी वाया
By दीपक शिंदे | Published: February 25, 2023 12:38 PM2023-02-25T12:38:05+5:302023-02-25T12:38:32+5:30
जलसंपदा विभागाच्या चुकीच्या कारभारामुळे मोठे नुकसान
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात बर्गेवाडी गावानजीक धोम डावा कालवा शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास फुटला. रोटेशन सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून शेजारच्या रस्त्यावर व शेतामध्ये पाणी आले आहे. जलसंपदा विभागाने तातडीने पाणी बंद केले आहे. जलसंपदा विभागाच्या चुकीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
धोम डाव्या कालव्याचे उन्हाळी रोटेशन सुरू असून दोनच दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले आहे. बर्गेवाडी गावानजीक सकाळी हा कालवा फुटला. हजारो लिटर पाणी वाया गेले असून लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठले आहे, तसेच रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे.
धोम कालवा विभाग कालव्याची वेळेवर देखभाल व दुरुस्ती करत नसल्याने असे प्रसंग वारंवार उद्भवत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कोरेगाव तालुक्यातील कालव्यांची देखभाल दुरुस्ती युद्धपातळीवर हाती घ्यावी व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.