मायणीसह धोंडेवाडी, सूर्याचीवाडी ग्रामस्थ तारळीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:14+5:302021-04-03T04:35:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : दोन वर्षांपूर्वी मोठा संघर्ष करून मायणीसह धोंडेवाडी, सूर्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी तारळी प्रकल्प कालव्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : दोन वर्षांपूर्वी मोठा संघर्ष करून मायणीसह धोंडेवाडी, सूर्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी तारळी प्रकल्प कालव्याचे काम स्वखर्चाने पूर्ण केले. मात्र, यावर्षी मार्च संपला. शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, तरीही प्रकल्प कालव्यातून पाणी आले नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी आजही तारळीतील पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
गेल्या अनेक दशकांपासून तारळी प्रकल्प कालव्याची कामे खटाव तालुक्यातील पूर्व भागातील पळसगाव, धोंडेवाडी, सूर्याचीवाडी, मायणी आदी गावांच्या परिसरात अपूर्ण होती. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी या भागातील शेतकऱ्यांना मिळत नव्हते. पाणी मिळत नसल्याने उन्हाळ्यात शेतीसह पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत होता. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी दोन वर्षांपूर्वी अपूर्ण कालव्याच्या कामासाठी स्वखर्चाने सुमारे ऐशी हजारांची रक्कम घालून या कालव्याचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण केले होते.
त्यावर्षी तारळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाण्याची चाचणी घेण्यासाठी कालव्यामध्ये पाणी सोडले होते तर गतवर्षी धोंडेवाडी व सूर्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी सुमारे पंचेचाळीस हजार रुपये भरून चार दिवसांसाठी पाणी विकत घेतले होते. पाणी विकत घेतल्यामुळे गतवर्षी या परिसरातील शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. त्यामुळे या भागात फारसा दुष्काळ जाणवला नाही व पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला होता. त्यामुळे शासनाला टँकर सुरू करावे लागले नाहीत.
धोंडेवाडी, सूर्याचीवाडी भागांमध्ये पाणी आल्याने हे पाणी पुढे मायणी परिसरात येत असल्याने मायणी परिसरातील शेतकऱ्यांनीही पैसे गोळा करून हे पाणी विकत घेतले होते. त्यामुळे एकंदरीत गतवर्षी थोड्याफार प्रमाणात पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. मात्र, यावर्षी मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरू झाला तरीही अधिकाऱ्यांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मार्च संपून एप्रिल लागला तरीही तारळीचे पाणी शिवारात न आल्याने या भागातील ग्रामस्थ व शेतकरी आजही या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
कोट...
पाणी शेतीसाठी सोडण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, हे अधिकारी गतवर्षीचे पैसे तुम्ही देणे आहे. ते भरल्याशिवाय पाणी सुटणार नाही, असे सांगत आहेत. मात्र, नेमके किती पैसे भरायचे हे सांगत नाहीत व गतवर्षी पैसे भरल्याची पावतीही अद्याप दिलेली नाही.
- हणमंत भोसले, उपसरपंच, धोंडेवाडी
चौकट-
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करणे गरजेचे
अनेक ठिकाणी मुख्य कालव्याला जोडणाऱ्या उपपाटांची कामे अपूर्ण आहेत, तरीही या कामाबाबत अजून कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. तरीही पाणी वाटप समित्या करून पाट हस्तांतराचा घाट घातला जात आहे.
उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे आता खरी पाण्याची गरज आहे व पाणी मिळण्यासाठी शेतकरी पैसे भरायला तयार आहेत. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.
तारळी प्रकल्पातून धोंडेवाडी, सूर्याचीवाडी व मायणी भागाला पाणी देणारा कालवा आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. (छाया : संदीप कुंभार)