पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!
By सचिन काकडे | Published: June 27, 2024 09:34 PM2024-06-27T21:34:17+5:302024-06-27T21:34:33+5:30
रक्त संकलन मोहीम पूर्ण : आठ दिवसांत येणार अहवाल
सातारा: जिल्हा आरोग्य व हिवताप विभागाने हत्तीरोग निर्मूलनासाठी हाती घेतलेली रक्तसंकलन मोहीम पूर्ण झाली आहे. या मोहिमेंतर्गत आठ तालुक्यांमधील पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले असून, या रक्तातून हत्तीरोगाचे निदान केले जाणार आहे.
हत्तीरोग हा शरीर विद्रूप करणारा रोग असून, जिल्ह्यात हत्तीरोग बाधित रुग्णांची संख्या ४७ इतकी आहे. या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ‘राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण’ कार्यक्रमांतर्गत दि. १९ ते २६ जून या कालावधीत हत्तीरोग रुग्ण शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत गावांना भेटी देऊन तेथील कुटुंबाचे रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा, आरोग्य सेवक, आरोग्य सेविकांवर या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सातारा, कोरेगाव, महाबळेश्वर, खंडाळा, कऱ्हाड, फलटण, माण व खटाव तालुक्यांतील पाच हजार ९७५ नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी ५ हजार ९५१ नमुने संकलित करण्यात आले. रात्री ८ ते १२ या वेळेत रक्ताचे नमुने घेण्यात आले. पुणे येथील हत्तीरोग सर्वेक्षण पथकाद्वारे रक्ताची तपासणी करून आठ दिवसात निष्कर्ष काढला जाणार आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी महेश पिसाळ, एस. एस. माळवे, राज्य सर्वेक्षण पथकाचे गणेश पारखी यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.