बिबट्याच्या भीतीने ‘सातच्या आत घरात’!
By admin | Published: October 6, 2016 11:40 PM2016-10-06T23:40:17+5:302016-10-07T00:10:58+5:30
उरूलमध्ये दहशत : शिवारात जाण्याचीही शेतकऱ्यांना भीती
मल्हारपेठ : गेल्या महिन्यापासून उरूल घाटासह डोंगर भागातील वाड्या-वस्तीवर बिबट्याची दहशत सुरू असून, तांबेवाडी-ठोमसे रस्ता व उरूल घाटात वारंवार दर्शन होत आहे. सुगीचे दिवस सुरू असल्याने शेतात जाण्यास शेतमजूर, शेतकरी, महिला घाबरत आहेत. उरूल भागातील कुत्र्यांची संख्या महिनाभरात घटल्याने रात्री सातच्या आत घरात येण्याच्या सूचना कुटुंबांनी नोकरीस असणाऱ्या सदस्यांना दिल्या आहेत. वन विभागास माहिती देऊन ही उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याची तक्रार ग्रामस्थांच्यातून होत आहे.
महिन्यापूर्वी उंब्रज-पाटण मार्गावरील उरूल घाटात बिबट्याचे दर्शन झाले. ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांच्या मागे बिबट्या लागत होता. त्या दिवसापासून दोन बिबट्यांचा वावर उरूल, ठोमसे भागातील जुगाई माळ, लाठ्यांचा माळ, मल्हारपेठ जवळील गवळण दरा, देसाई शेत व उरूल घाटात बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे उरूल भागातील ग्रामस्थांमध्ये चांगलीच दहशत माजली असून, गेल्या महिन्यापासून शेतातही दोघे, तिघेजण जात आहेत. जनावरे उघड्यावर न बांधता शेडात बांधत आहेत. तसेच नोकरीसाठी जाणाऱ्या मंडळींना रात्री सातच्या आत घरात येण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावात असणाऱ्या मोकाट कुत्र्यांची संख्या कमी झाली असून, बिबट्यानेच त्यांचा फडशा पाडला असावा, असा अंदाज ग्रामस्थांच्यातून व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्री साडेनऊ वाजता दुचाकीवरून आलेले उरूलचे ग्रामस्थ बापू चव्हाण यांना उरूल घाटात बिबट्या मृत जनावर खात असल्याचे दिसले. त्यानंतर उरूल बस थांब्यावर असणाऱ्या सागर देशमुख, महेश निकम व मनोज चव्हाण यांनीही खात्री केली. बिबट्या दिसल्याची बातमी वाऱ्याप्रमाणे भागात पसरत असून, खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग व कडधान्ये काढण्याची सुगी चालू असल्याने शेतकरी, महिला व शेतमजूर शिवारात जाण्यास भीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागास माहिती देऊनही बघतो, येतो की, लोकांनी काळजी घ्यावी अशी उत्तरे ऐकण्यास मिळत आहेत. पाळीव जनावरे किंंवा एखाद्या मनुष्यावर हल्ला होण्यापूर्वी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उरूल भागातील ठोमसे, पोळाचीवाडी, तांबेवाडी, गणेवाडी, बोडकेवाडी ग्रामस्थांच्यातून होत आहे. (वार्ताहर)
दुचाकीस्वारांचा जीव मुठीत
काही दिवसांपूर्वी उरूल घाटात उंब्रज-पाटण मार्गानजीक बिबट्या ठाण मांडून बसला होता. या मार्गावरून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांचाही त्याने पाठलाग केला. त्यामुळे त्यावेळी घाटात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आजही तेथे हिच परिस्थिती असून, घाटातून मार्गस्थ होताना दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरूनच जावे लागत आहेत.