पालकमंत्र्यांनी फलटण तालुका पेटल्यावर यायचे होते का?
By admin | Published: March 10, 2015 10:44 PM2015-03-10T22:44:36+5:302015-03-11T00:12:36+5:30
पत्रिका नाट्य : रामराजेंच्या उद्गारानंतर शिवसेनेचा पलटवार
फलटण : फलटण नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकिय इमारत लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेत नाव नसल्याने मानापमान नाट्य व दोन वेगवेगळ्या निमंत्रणपत्रिकेचे गौडबंगाल काय? याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. कार्यक्रम पत्रिकेत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांचे नाव डावलून त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने जाहिर निषेध करीत असल्याचे पत्रक शिवसेनेने काढले आहे. त्यातच नगरपरिषदेच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर पालकमंत्र्याना आमदार रामराजें यांनी पत्रक काढून त्यांच्या जखमेवर मिठ चोळले.लोकार्पण सोहळ्याच्या दोन वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्याने गोंधळात अजूनच भर पडली आहे. वाटण्यात आलेल्या पहिल्या पत्रिकेत जिल्हाधिकारी, नगर रचनेचे संचालक, सहायक संचालक, मुध्याधिकारी यांच्यासह मान्यवरांची नावे होते. परंतु नंतर वाटण्यात आलेल्या पत्रिकेत लक्ष्मणराव पाटील यांचे नाव वाढवून या चौघांचीही नावे काढण्यात करण्यात आली. याबाबत शिवसेनेने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की सत्ताबदल झाल्याचे रामराजे यांच्या पचनी पडत नसून द्वेषापोटी पालकमंत्र्यांना डावलण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही आमदार व सर्व नगराध्यक्षांची नावे पत्रिकेत छापण्यात आली आहेत. फलटण नगरपरिषदेच्या घोटाळ्याचे पुरावा असलेल्या कागदपत्रांचे गोडाऊन जाळल्यानंतर पालकमंत्र्यांना भेट देणे आवश्यक होते. व या प्रकरणाच्या चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले होते. पालकमंत्र्यांनीे नगरपरिषद जळाल्यानंतर यायचे का? तालुका पेटल्यावर यायचे हे रामराजेंनी स्पष्ट करावे. मंत्रीपदाच्या लोभापोटी आपल्या वाट्याचे पाणी बारामतीकरांना देऊन निम्मा तालुका होरपळत ठेवला आहे. आता निदान आगी लावण्याचे काम करू नये रामराजे यांनी आपली राजकीय उंची दाखवून दिल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सेनेचे तालुकाध्यक्ष शंभुराज खलाटे यांनी आपल्या पत्रकात शेवटी म्हटले आहे की अवकाळी पाऊस, दुष्काळ, पाणीटंचाई यासारखे अनेक प्रश्न समोर असताना त्याबाबत माहिती घेऊन संबंधितांना सूचना देऊन सर्व सामान्य लोकांना दिलासा देणे आवश्यक असताना पालकमंत्री अशा किरकोळ घटनांची पाहणी करतात हे दुर्दैवी आहे. (प्रतिनिधी)
नगरपरिषदेमधील छोट्याशा अगीच्या पाहणीसाठी येण्यापूर्वी पालकमंत्र्यानी आगाऊ सूचना दिली असती तर त्यांचे यथोचित स्वागत करुन सर्व माहिती दिली असती.
-रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार