डिझेलच्या दरवाढीने शेती व्यवसाय अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:46+5:302021-03-04T05:13:46+5:30
वरकुटे-मलवडी : बदलत्या आधुनिकीकरणामुळे शेतीमध्ये बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्यामुळे पेरणी, नांगरणी, कोळपणी, फवारणी, रोटरणे, फिरवून गवत कापने या प्रकारची ...
वरकुटे-मलवडी : बदलत्या आधुनिकीकरणामुळे शेतीमध्ये बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्यामुळे पेरणी, नांगरणी, कोळपणी, फवारणी, रोटरणे, फिरवून गवत कापने या प्रकारची सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. मात्र डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रँक्टरने शेतीची मशागत करताना शेतकऱ्यांना दरवाढीचा फटका बसला आहे.
शेतीचा वाढता खर्च आणि बाजारभावाने मिळणारी किंमत यांचा ताळमेळ बसत नसल्याने, शेतीचा व्यवसाय तोट्यात जात आहे. मागीलवर्षी नांगरणी १२०० रुपये प्रति एकर होती, ती यावर्षी १६०० रुपये झाली आहे. रोटाव्हेटर मागील वर्षी ११०० रुपयांत होत असे. मात्र आता १५०० ते १६०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच दिन प्रतिदिन पेट्रोल व डिझेलचे भाव वाढतच असल्याने सर्वसामान्य शेतकरी वाहनधारकांनी जगायचे कसे..? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
डिझेलच्या दरवाढीने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे. शेतीमध्ये जास्तीत जास्त ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, थ्रेशर, जेसीबी यांचा वापर वाढला आहे. मजुरांचा तुटवडा आणि कमी वेळात अधिक काम करण्यासाठी सर्व शेतीची कामे यंत्रानेच होऊ लागली आहेत. पेट्रोलच्या पाठोपाठ डिझेलच्या किमतीही वाढल्याने याचे गंभीर परिणाम सर्वसामान्यांना सोसावे लागत आहेत. अगोदरच कोरोना संकटामुळे त्रस्त असलेल्या जनतेला आता पेट्रोल-डिझेलच्या महागाईला तोंड द्यावे लागत आहे.
(कोट)
गेल्या पंधरा वर्षातील पेट्रोल, डिझेलच्या दरात पहिल्यांदाच एवढ्या वेगाने वाढ झाली आहे. आताच्या काळात सर्वच शेतीची कामे जेसीबी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागली आहेत. कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नसल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने, सर्वच शेतीच्या कामांचे दर वाढले आहेत. मात्र शेतकरी यामध्ये भरडला जावू लागला आहे.
- वैभव शिंगाडे, व्यावसायिक, बनगरवाडी