सातव्या वेतनाच्या फरकावरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:24+5:302021-07-02T04:26:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा पालिकेच्या ४१३ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता रोखीने देण्यावरून पालिका प्रशासनाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा पालिकेच्या ४१३ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता रोखीने देण्यावरून पालिका प्रशासनाचे सध्या तळ्यात-मळ्यात सुरू आहे. नगराध्यक्षांच्या लेखी शिफारसीनंतरही तब्बल १ कोटी २८ लाख रूपयांचा फरक देण्यावरून लेखा विभागाने नियमांचा पाढा वाचल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ही फरकाची रक्कम रोखीने न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
सातारा पालिकेच्या ४१३ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची एकूण १ कोटी २८ लाख रुपये रक्कम अदा करावयाची आहे. वास्तविक ही रक्कम गेल्यावर्षीच कर्मचाऱ्यांच्या फंडात जमा करणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे यंदा दोन वर्षांची रक्कम रोखीने मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. मात्र, ही रक्कम रोखीने द्यायची की फंडात जमा करायची, या विषयावर प्रशासनाचा कायदेशीर काथ्याकूट सुरू आहे. नगर परिषद संचालनालयाच्या आढावा बैठकीत राज्य संवर्ग अधिकारी संघटनेच्या सदस्यांनी फरकाची रक्कम रोखीने देण्याचा आग्रह धरला होता; परंतु सातारा पालिका प्रशासनाने विशेषत: लेखा विभागाने हे प्रकरण तळ्यात-मळ्यात ठेवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
सातारा ‘अ’ वर्ग पालिका आहे. पालिकेतील सर्वच कर्मचारी गेल्या दीड वर्षांपासून कोरोना प्रतिबंधासाठी जबाबदारीने काम करत आहेत. कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात कोणतीही कसूर ठेवली नाही. मग प्रशासनाला सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता रोखीने देण्यामध्ये अडचण काय? असा प्रश्न कर्मचारी संघटनांनी उपस्थित केला आहे. या विषयावरून आता कर्मचारी संघटनादेखील आक्रमक झाल्या आहेत.
(चौकट)
... तर धरणे आंदोलन
कर्मचाऱ्यांना फरकाचा पहिला हप्ता रोखीने द्यावा, अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे. मात्र, पालिका प्रशासनाने अद्याप याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. पालिकेने ३ जुलैपर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा दि. ५ जुलैपासून धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा सातारा म्युनिसिपल कामगार युनियनचे (लाल बावटा) प्रमुख श्रीरंग घाडगे यांनी दिला आहे.
लोगो : सातारा पालिका फोटो