अवकाळीमुळे जिल्ह्यातील ८५० हेक्टरवरील पिकांवर अवकळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:49+5:302021-02-24T04:40:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका नजरअंदाजे ८५० हून अधिक हेक्टरला बसला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका नजरअंदाजे ८५० हून अधिक हेक्टरला बसला आहे. यामध्ये कमी-अधिक फरकाने सुमारे १७०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तर सध्या पंचनाम्याचे काम सुरू असून बुधवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नुकसान क्षेत्राचा आकडा समोर येणार आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यात अवकाळी पाऊस झाला, पण पावसाबरोबरच मोठ्या प्रमाणात गाराही पडल्या. यामुळे पिके आणि फळांचे नुकसान झाले. या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठ्यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत नजरअंदाजे ८५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर १ हजार ७४० शेतकऱ्यांना त्याचा फटका बसल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील खटाव तालुक्यात सर्वाधिक पीक नुकसान झालेले क्षेत्र आहे. या तालुक्यात नजरअंदाजे नुकसान क्षेत्र ७७९ हेक्टर आहे. यामध्ये ज्वारी आणि गहू पिकाचेच नुकसान झालेले आहे. येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १ हजार ५६२ आहे. फलटण तालुक्यात अंदाजे ४८ हेक्टरचे नुकसान आहे, तर शेतकऱ्यांचा आकडा १०७ आहे. या तालुक्यातही ज्वारी आणि गहू पिकांचेच नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर वाई तालुक्यात २५ हेक्टर क्षेत्र बाधित असून शेतकऱ्यांची संख्या ४८ आहे. वाई तालुक्यातही ज्वारी आणि गव्हालाच फटका बसलाय. कोरेगाव तालुक्यात ४.५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान आहे, तर महाबळेश्वर तालुक्यात २ हेक्टरवरील स्ट्रॉबेरी फळाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
कोट :
जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे नजरअंदाजे समोर आले आहे. बुधवारपर्यंत पंचनाम्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर खऱ्याअर्थाने पीक नुकसानीचा आकडा समोर येईल.
- गुरुदत्त काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा
.......................................................