मतभेद गावच्या विकासामध्ये नसावेत : संजीवराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:44 AM2021-09-15T04:44:49+5:302021-09-15T04:44:49+5:30
वाठार निंबाळकर : ‘मतभेद असले तरीही ते गावच्या विकासामध्ये नसावेत. सोनवडी खुर्द गावकऱ्यांनी मतभेद बाजूला सारून विकासाला गती दिली ...
वाठार निंबाळकर : ‘मतभेद असले तरीही ते गावच्या विकासामध्ये नसावेत. सोनवडी खुर्द गावकऱ्यांनी मतभेद बाजूला सारून विकासाला गती दिली असून, त्यांचा आदर्श इतर गावांनी घ्यावा,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
सोनवडी खुर्द (ता. फलटण) येथील विविध विकासकामे उद्घाटन व भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, सरपंच शालन सूर्यवंशी, महादेव माने, पोलीसपाटील संघटनाचे हणमंत सोनवलकर, ग्रामसेवक सुरेश निंबाळकर, लक्ष्मण सोनवलकर, उपसरपंच शरद सोनवलकर उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, ‘तालुक्यात गेली तीस वर्षे राजकारण करताना गटा-तटाचे व नकारात्मक द्वेशाचे राजकारण केले नाही. यापुढेही तशाप्रकारचे राजकारण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण तसेच व इतर पदाधिकाऱ्यांकडून होणार नाही. मात्र तालुक्यातील राजकारणात काही विघ्नसंतोषी मंडळी दाखल झाली आहेत. त्यांच्या विषारी विचारांना बळी पडू नये.’
यावेळी माणिकराव सोनवलकर, सचिन रणवरे, लक्ष्मण सोनवलकर, शरद सोनवलकर, बापूसाहेब मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. दत्तात्रय सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप सोनवलकर, बापूसाहेब सोनवलकर, अक्षय सोनवलकर उपस्थित होते. सरपंच शालन सूर्यवंशी यांनी स्वागत केले. दादासाहेब शिंदे यांनी आभार मानले.