तारळेत रस्ता खोदल्याने वाट बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:34 AM2021-03-15T04:34:52+5:302021-03-15T04:34:52+5:30
तारळे ते नागठाणे हा विभागातील ग्रामस्थांचा मुख्य रहदारीच्या मार्ग आहे. हा रस्ता तारळे बसस्थानकापासून आंबा चौक ते ग्रामपंचायतीच्या पाठीमागून ...
तारळे ते नागठाणे हा विभागातील ग्रामस्थांचा मुख्य रहदारीच्या मार्ग आहे. हा रस्ता तारळे बसस्थानकापासून आंबा चौक ते ग्रामपंचायतीच्या पाठीमागून पुलावरून कोंजवडे व तेथून पुढे नागठाणेकडे जातो. नागठाणे व सातारा येथे उच्च शिक्षणासाठी तसेच व्यवसायासाठी दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. एसटीसह माल वाहतूक करणारे अवजड वाहनेही या रस्त्याने ये-जा करीत असतात. आंबा चौक ते तारळी नदीपर्यंत रस्ता अरुंद आहे; तर ग्रामपंचायत ते नदीपर्यंत एका बाजूला मोठा नाला आहे. त्यामुळे येथे रस्ता बराच अरुंद बनला आहे. समोरासमोर चारचाकी वाहने आली तरी येथे साईडपट्टीवर उतरावी लागतात. त्यामुळे अपघात घडत असतात. लहान-मोठ्या वाहनचालकांची येथे दमछाक होत असते. रहदारीची गंभीर अवस्था असताना एका कंपनीने केबलसाठी खोदकाम केले आहे. यापूर्वी मोठा रस्ता असताना जमिनीखालून बोअरिंग करून केबल टाकली होती. मग या ठिकाणी आडमुठेपणा का केला जात आहे, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
- चौकट
ठेकेदारापुढे अधिकारी हतबल !
काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली असता त्यांनी ठेकेदाराला सूचना करतो, असे सांगून वेळ मारून नेली. त्यामुळे ठेकेदारापुढे अधिकारी हतबल असल्याचे दिसून येत आहे.