‘डिजिटल’ मुळे सुलेखन हद्दपार !
By admin | Published: September 14, 2016 09:58 PM2016-09-14T21:58:43+5:302016-09-15T00:03:27+5:30
कॉम्प्युटर शिक्षणाचा परिणाम : सुलेखनाचा सराव नाही; विद्यार्थ्यांच्या हाती आले टॅब
संतोष गुरव -- कऱ्हाड सुंदर हस्ताक्षर हे व्यक्तीचे वैशिष्ट्य दाखवत असते. अक्षरांच्या पे्रमात पडण्यासारखी सुंदर अक्षरे काढण्याची कला ज्याला प्राप्त होते. त्याचे सर्वजण कौतुक करतात. या उलट ज्याचे हस्ताक्षर खराब असेल त्याची प्रतारणाही केली जाते. सध्या खासगी व प्राथमिक शाळांमधून देण्यात येणाऱ्या शिक्षणामध्ये कॉम्प्युटरचा समावेश करण्यात आल्याने पूर्वीची सुलेखनाची कला ही नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे.
पूर्वी सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांकडून बॉलपेन, जेलपेनने तसेच पाटीवर पेन्सिलने सराव करून घेतले जात. लिखाणामुळे वाचनही होते. या प्रमुख हेतूने गृहपाठही विद्यार्थ्यांना शाळेतून शिक्षकांकडून दिला जातो. जेणेकरून विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर व्हावे व अभ्यासही पूर्ण व्हावा. मात्र, बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळाप्रमाणे आज बॉलपेन, जेलपेनची जागा संगणक, मोबाईलने घेतल्याने लिखाण कमी झाले. आज शाळा, महाविद्यालय तसेच विविध कोर्सच्या अॅकॅडमीतून संगणकाद्वारे शिक्षण देण्यास सुरुवात केल्याने आजच्या पिढीने सुलेखनाशी नकळत फारकत घेतली आहे.
काही शासकीय कार्यालयातही नेमकी हिच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी संगणकाद्वारे आॅनलाईन कामकाज केले जात आहे. त्याचा परिणाम सध्या कर्मचाऱ्यांच्या कामावरही दिसून येत आहे. शासकीय माहिती वरिष्ठांना पाठविण्यासाठी कर्मचाऱ्यांना अगोदर लिखाण करून त्याची फाईल तयार करावी लागत आहे. संगणकाची सवय लागल्याने लिखाण करताना अक्षरही व्यवस्थित येत नसल्याने अधिकाऱ्यांनाही अनेक अडचणी येत आहेत. आॅनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याने पेरलेस कामकाज केले जात केले जात आहे. त्यामुळे कागद आणि पेनचे भावनिक नाते संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
विविध संस्था, सामाजिक संघटना तसेच शाळेतून सुंदर हस्ताक्षरांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, प्रशिक्षण वर्ग यांचे आयोजन केले जाते. मात्र, त्याचाही किती प्रमाणात प्रभाव विद्यार्थ्यांवर होतो हा संशोधनाचा विषय आहे. पूर्वीच्या काळात दुरेगी चौरेगी वह्यांतून देण्यात येणाऱ्या गृहपाठाचे प्रमाण आता कमी झाले आहे. खासगी क्लासेसमध्ये शाळेतील सर्व अभ्यास हा शिकविला जात असल्याने शाळेतील शिक्षकही शाळेत मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येते. वाढत्या कॉम्प्युटरच्या वापरामुळे मराठीप्रमाणे इंग्रजी हस्ताक्षराबाबतही ओरड आहे. डॉक्टरांकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या प्रिस्कीप्शनवरील अक्षर हे मेडिकलवाल्यांशिवाय रुग्णांना समजत नाही. त्यामुळे नेमकी कोणती औषधे खरेदी करावी, असा प्रश्नही रुग्णांपुढे अनेकवेळा निर्माण होत आहे.
खराब अक्षरामुळे परीक्षेत गुणही कमी !
मुलांचे अक्षर सुंदर व वळणदार असावे, अशी त्यांच्या पालकांची व शिक्षकांची अपेक्षा असते. परीक्षेचे पेपर हे हातानेच लिहावे लागतात. पेपर लिहिताना सुलेखनाची कला असणे आवश्यक असते. कारण प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहूनही हस्ताक्षर जर नीट नसेल तर शिक्षकांना पेपर तपासताना समजत नाही. परिणामी उत्तर बरोबर असूनही गुण कमी दिले जातात.
सुंदर हस्ताक्षरासाठी कार्यशाळा
लॅपटॉप व कॉम्प्युटरच्या वापरामुळे मुलांमधील हस्ताक्षराची कला लोप पावत चालली असल्यामुळे त्यांना सुंदर हस्ताक्षर काढता यावे म्हणून शहरात अनेक सामाजिक संस्था, शाळांमधून सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे, कार्यशाळेचे आयोजन केले जाते. त्या कार्यशाळेतून मुलांना लिखाणाची सवय लावली जाते
पूर्वी शाळेत गृहपाठ दिला जायचा त्यामुळे लिखाण खूप करावे लागत होते. आता कॉलेजला आल्यामुळे कॉलेजमध्ये कमी प्रमाणात नोट्स लिहाव्या लागतात. असायमेन्ट व परीक्षेपुरतेच लिखाण करावे लागते. लिखाणाचा नियमित सराव नसल्याने अक्षर खराब येते.
- कुणाल माने, महाविद्यालयीन विद्यार्थी
कॉम्प्युटर टाईपिंगची सवय असल्याने वहीवर लिहायला गेल्यास अक्षर खराब येते. लिखाणाची सवय नसल्यामुळे तसेच नियमित सराव नसल्याने खराब अक्षरामुळे परीक्षेच्या वेळी खूप सराव करावा लागतो.
- उदय लोकरे, महाविद्यालयीन विद्यार्थी,
किरपे, ता. कऱ्हाड