स्वच्छतेची डिजिटल यंत्रणा चोवीस तास आॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:44 PM2018-07-30T23:44:42+5:302018-07-30T23:55:43+5:30
शहरातील जुन्या तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या ठिकाणी पालिकेच्या स्वच्छतेबाबत माहिती देण्यासाठी सात महिन्यांपूर्वी डिजिटल फिडबॅक मशीन बसविण्यात आली.
संतोष गुरव ।
कऱ्हाड: शहरातील जुन्या तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या ठिकाणी पालिकेच्या स्वच्छतेबाबत माहिती देण्यासाठी सात महिन्यांपूर्वी डिजिटल फिडबॅक मशीन बसविण्यात आली. ती आजही सुस्थितीत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा निकाल लागला. तरी आजही नागरिकांच्या सोयीसाठी ही फिडबॅक डिजिटल यंत्रे चोवीस तास आॅन आहेत.
कऱ्हाड शहराच्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील घरगुती लोकांना स्वत:चे शौचालये पालिकेने बांधून दिली आहे. तर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील चाळीस ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. तसेच अजून काही ठिकाणी नव्याने शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. अशा शौचालयाच्या ठिकाणी पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात डिजिटल मशीन बसविली. या मशीनवर ‘क्या यह शौचालय स्वच्छ है? असे लिहले आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी हिरवा, पिवळा व लाल या रंगाची बटणं आहेत.
हिरवा रंग स्वच्छ, पिवळा ठिक आणि लाल हा अस्वच्छ असे तीन संदेश देण्यात आले आहेत. शौचालयाबाबत काय वाटते? याबाबत नागरिकांनी या तीन बटणांपैकी कोणतेही एक बटण दाबून आपल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेवेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही नोंदविल्या. त्याचा परिपाक म्हणून पालिकेने या स्पर्धेत यश मिळविले. आता स्पर्धा झाली निकालही लागले. स्वच्छ सर्व्हेक्षण उपक्रमांचा एक भाग म्हणून पालिकेने बसविलेले डिजिटल यंत्रे आजही सुस्थितीत आहेत.
कऱ्हाड पालिकेत आरोग्य विभागात शंभरच्या आसपास सफाई कर्मचारी आहेत. त्यातील काहींना शौचालयाचे क्लिनिंग, बाहेरील बाजूची नियमित स्वच्छता, ट्रॅक्टर तसेच घंटागाडीद्वारे शहरातील ओला व सुका कचरा गोळा करणे तर महिला कर्मचाऱ्यांना रस्त्यांवरील कचरा गोळा करून त्याची स्वच्छता करणे आदी कामे देण्यात आली आहेत. या सफाई कर्मचाºयांकडून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असल्याचे दिसुन येत आहे.
स्वच्छतेबाबत कऱ्हाड पालिकेचे लक्ष
शहरातील भाजी मंडई येथील चांदणी चौक, कृष्णाबाई कार्यालय रोड, हटकेश्वर मंदिर, बापूजी साळुंखे पुतळा परिसर, मंगळवार पेठ, स्टेडियम परिसर, प्रभात टॉकीज, एसटी स्टँड परिसर, कर्मवीर चौक, कृष्णा नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, जलशुद्धीकरण केंद्र, दूरध्वनी केंद्र परिसर याठिकाणी पालिकेकडून स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
आकर्षक संदेश लक्षवेधी
पालिकेच्या वतीने विविध रंग वापरून शिवाय आकर्षक संदेश टाकून शहरातील रस्त्याकडेला व दर्शनी भागात असलेल्या इमारतींच्या भिंती रंगविल्या गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश चांगल्यारितीने पोहोचत आहे.