जावळीत बाचाबाची, नाराजी!
By admin | Published: January 27, 2017 11:19 PM2017-01-27T23:19:51+5:302017-01-27T23:19:51+5:30
राष्ट्रवादीत असंतोष : उमेदवार मुलाखतीवेळी वाद चव्हाट्यावर
मेढा : जावळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीच्या उमेदवार मुलाखती कार्यक्रमादरम्यान वसंतराव मानकुमरे व योगेश गोळे यांच्यात झालेल्या बाचाबाचीने राष्ट्रवादीतील असंतोष उफाळून आल्याचे चित्र आहे. यामुळे जावळीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान, तालुक्यातील अमित कदम यांना उमेदवार निवडीत डावलल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीतील वातावरण गढूळ झाल्याचीही चर्चा आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मेढा येथे घेण्यात आल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे यांच्यासह कोअर कमिटी मार्फत या मुलाखती घेण्यात आल्या. म्हसवे जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये दत्ता गावडे, बुवासाहेब पिसाळ, हणमंतराव पार्टे, योगेश गोळे हे होते. म्हसवे गणात वसंतराव मानकुमरे हे देखील उभे राहण्यास उत्सुक असून, कुडाळ येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी स्वत:ची उमेदवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीतच जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवरच म्हसवे गटातून मुलाखत देण्यासाठी आलेले योगेश गोळे, दत्ता गावडे आदींनी मुलाखतीच्या वेळी वसंतराव मानकुमरे यांच्या उपस्थितीवरच हरकत घेतली व आमदार शिवेंद्रसिंहराजेंशी स्वतंत्रपणे बोलण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी वसंतराव मानकुमरे, कोअर कमिटीचे मच्छिंद्र क्षीरसागर यांची व दत्ता गावडे, योगेश गोळे यांच्याशी जोरदार बाचाबाची झाली. ही शाब्दिक चकमक अखेर हमरी-तुमरीवर आली. दरम्यान, याबाबतचा निर्णय आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून घेऊ, अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते संभ्रमात असल्याची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, अमित कदम यांना या उमेदवार मुलाखत प्रक्रियेमध्ये पूर्ण डावलल्याने कदम गटाची नाराजी झाल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)