आंतरधर्मीय-आंतरजातीय विवाह संबधित समिती स्थापन करणे चुकिचे - दिलीप वळसे पाटील
By प्रमोद सुकरे | Published: December 15, 2022 07:54 PM2022-12-15T19:54:25+5:302022-12-15T19:55:07+5:30
आंतरधर्मीय-आंतरजातीय विवाह संबधित समिती स्थापन करणे चुकिचे असल्याचे दिलीप वळसे यांनी म्हटले.
कराड (सातारा) : आंतरधर्मीय- आंतरजातीय विवाह संबधित समिती स्थापन करणे हा अतिशय चुकीचा विचार आहे. राजकीय भूमिकेमधून लव्ह जिहाद सारखा प्रश्न निर्माण करून आज त्यामध्ये नविन कायदा निर्माण करण्याबाबत चर्चा होते. ती या देशाच्या राज्यघटनेशी सुसंगत नाही. घटना अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी देत नाही. या निर्णयामुळे समाजा- समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम होत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केला आहे.
कराड येथे विजय दिवस समारोह तर्फे दिला जाणारा जीवन गाैरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमासाठी दिलीप वळसे- पाटील आले होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, नंदकुमार बटाणे, प्रशांत यादव,प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. एकीकडे राज्यात लव जिहादच्या विरोधात मोर्चे निघत आहेत. आमदार नितेश राणे हे कायदा केला जावा, यासाठी आग्रही असताना दुसरीकडे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मात्र घटनेत कोठेही विषय नाही. त्यामुळे या विरोधात कायदा करण्याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
वळसे पाटील म्हणाले, राज्यात नव्हे तर देशात इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हे तर देशांशी संबधित प्रश्न आहे. केवळ महापुरूषांची बदनामी नव्हे तर इतिहास पुसण्याचे आणि बदलण्याचे काम सुरू आहे. काही अजेंडा सेट करून अशी वक्तव्ये केली जात आहेत आणि इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकारच्या कामाबाबत आम्ही अजिबात समाधानी नाही. सध्याचे सरकार अजूनही सभा- समारंभात गुंतलेले आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्टे देण्याचा काम केलेले आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र विकासकामे रखडलेले असल्याचे माजी गृहमंत्री दिलीप- वळसे पाटील यांनी सांगितले.
मोर्चा निघणारच
महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या मोर्चाला सरकारने परवानगी दिली पाहिजे. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. परंतु परवानगी मिळो अगर न मिळो हा महाविकास आघाडीचा मोर्चा निघणारच असे, दिलीप वळसे- पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.