Satara News: विधवा भावजयीशी दिराने बांधली लग्नगाठ, तीन वर्षांच्या मुलाचीही स्वीकारली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 03:52 PM2022-05-31T15:52:50+5:302022-05-31T15:53:12+5:30
काही महिन्यांपूर्वी मुंबई येथे झालेल्या अपघातामध्ये पतीचा मृत्यू झाला. पतीच्या आकस्मिक जाण्याने तेजस्विनीवर दुःखाचा डोंगर कोसळला.
बाळासाहेब रोडे
सणबूर : जुन्या जाचक आणि कठोर रिती, रुढी आणि परंपरा तोडून पाटण तालुक्यातील काळगाव कुमाळ येथील एका विधवेची तिच्या दिराशी लग्नगाठ बांधण्याची क्रांतीकारक गोष्ट घडली आहे. या गोष्टीचे परिसरातून कौतुक होत आहे.
काळगाव येथून जवळच असलेल्या कुमाळ येथील तेजस्विनी पाटील हिचा चार वर्षांपूर्वी त्याच गावातीलच सुरज दिनकर देसाई यांच्याशी विवाह झाला होता. तेजस्विनीचे लग्न होऊन चार वर्षे झाली होती. तिला तीन वर्षांचा मुलगा देखील आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी मुंबई येथे झालेल्या अपघातामध्ये तिचे पती सुरज यांचा मृत्यू झाला.
पतीच्या आकस्मिक जाण्याने तेजस्विनीवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीत तेजस्विनी आणि तिच्या कुटूंबियांना तिच्या आणि तीन वर्षांच्या मुलाच्या पुढील आयुष्याचा प्रश्न पडला. मुलाच्या भविष्याचे काय होईल? या चिंतेने माहेरचे व्यथित होते. परंतु अशा परिस्थितीत पाटील व देसाई कुटूंबानी एकत्र बसत एक धाडसी निर्णय घेण्याचे ठरवले. त्यांनी तेजस्विनीच्या पतीच्या भावाशी म्हणजेच दीर सुधीर देसाई याच्याशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या सुधीर याने या निर्णयाला सहमती दर्शवत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तेजस्विनी आणि सुधीर यांचा विवाह पार पडला. यावेळी कुमाळ येथील देसाई व पाटील कुटूंबातील सर्व नातेवाईक व ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते.
विधवा प्रथेचे निर्मूलन व्हावे
राज्य सरकारने विधवा प्रथेबाबत एक परिपत्रक काढले असून, या प्रथेचे निर्मूलन होण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा विचार केला आहे. यासाठी ग्रामीण भागातील निर्देश दिले. शासनाचा निर्णय झाल्यानंतर लगेचच तिसऱ्या दिवशी सुधीर आणि तेजस्विनी यांचा विवाह झाला आहे.
येत्या मासिक बैठकीत दोघांचा ग्रामपंचायतीमार्फत सत्कार करण्यात येणार आहे. सुधीर, तेजस्विनी आणि या दोघांचे कुटूंबीय यांनी घेतलेला हा क्रांतीकारी निर्णय आहे. तो समाजाला आदर्शवत आहे. या लग्नामुळे तेजस्विनीला पुन्हा एकदा सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क मिळेल. - वसंतराव देसाई, उपसरपंच काळगाव