मिनी मंत्रालयातून थेट विधानसभेत एन्ट्री : राज्यात १८ जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:38 AM2019-11-01T00:38:07+5:302019-11-01T00:40:27+5:30
यामधील सर्वजण हे राज्यातील विविध जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्य, पदाधिकारी होते.असंख्य नेत्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या कामाच्या जोरावर राज्याचे नेतृत्व केले. त्यांची परंपरा प्रत्येक निवडणुकीत कोणी ना कोणी पुढे चालवत आले आहेत.
स्वप्नील शिंदे ।
सातारा : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम केलेले राज्यातील १८ जण विधानसभेत गेले आहेत. यातील काहीजण सदस्य होते तर कोणी अध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती म्हणूनही काम केलंय. यामध्ये रोेहित पवार, धीरज देशमुख, आदिती तटकरे, संजय शिंदे आदी मातब्बरांचा समावेश आहे. तर सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले महेश शिंदे हे कोरेगावचे आमदार ठरलेत.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थेत काम केल्यानंतर अनेकांनी राज्य आणि देशाचे नेतृत्व केले आहे. त्यामध्ये विलासराव देशमुख, शंकरराव जगताप, आर. आर. पाटील, रावसाहेब दानवे यांच्यासह असंख्य नेत्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या कामाच्या जोरावर राज्याचे नेतृत्व केले. त्यांची परंपरा प्रत्येक निवडणुकीत कोणी ना कोणी पुढे चालवत आले आहेत.
यंदाही राज्यातील अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी तसेच माजी सदस्य, पदाधिकाऱ्यांनी विधानसभानिवडणूक लढवायचीच, असा चंग बांधून आपापल्या मतदारसंघात दौरे सुरू केले होते. पक्षाचे तिकीट मिळावे, यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावली होती. वेळप्रसंगी बंडखोरी करत निवडणूक लढवली; मात्र सर्वांनाच यश मिळाले नाही. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाच्या देवेंद्र भुयार यांनी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडेंचा पराभव केला. भुयार हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपचे मंत्री राम शिंदे यांचा राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी पराभव केला. रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.
नगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या डॉ. किरण लहामटे यांनी भाजपच्या वैभव पिचड यांना पराभूत केले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघातून अपक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव केला. पाटील हे जिल्हा परिषद सदस्य आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावर शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी विजय मिळवला. महेश शिंदे हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेत. बीडमधील मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा त्यांचे पुतणे व राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला. तसेच लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे धीरज देशमुख, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे, नाशिक जिल्ह्याच्या कळवणमधून राष्ट्रवादीचे नितीन पवार, इगतपुरीमधून काँग्रेसचे हिरामण खोसकर, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघातून अपक्ष संजय शिंदे, अमळनेरमधून राष्ट्रवादीचे अनिल पाटील, भंडारा मतदारसंघातून भाजपचे अरविंद भलाधरे, औरंगाबाद जिल्ह्यातून वैजापूर मतदारसंघातून शिवसेनेच्या रमेश बोरनारे, उस्मानाबादमधून शिवसेनेचे कैलास पाटील, दर्यापूर मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे, सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातून काँग्रेसचे विक्रम सावंत, आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे आदींचा समावेश आहे. यामधील सर्वजण हे राज्यातील विविध जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्य, पदाधिकारी होते.
अनेकांनी उचलला सिंहाचा वाटा...
राज्यातील अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी व माजी पदाधिकाºयांनी निवडणूक लढवली; मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. तर काहींनी दोन पावले मागे घेत पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला.
संसदेतही धडक...
मिनी मंत्रालयाच्या सभागृहात आवाज उठविणाºया जिल्हा परिषद सदस्यांना संसदेची पायरीही चढण्याची संधी मिळालीय. जिल्हा परिषदेत केलेल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर कोल्हापूरचे संजय मंडलिक व हातकणंगलेचे धैर्यशील माने, दिंडोेरीतील भारती पवार, भिंवडीतील कपील पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून संसदेत धडक मारली आहे.