सातारा : 'गदिमा, भालजी पेंढारकर, डॉ. श्रीराम लागू, विजय तेंडुलकर यांच्या अनेक मार्गदर्शक तत्त्वांतून व विविधांगी विचारसरणीतून माझी दिग्दर्शनाची कला साकारताना मला अनेकांचे योगदान व मार्गदर्शन मिळाले. यातूनच या दिग्दर्शनाचे कसब मी माझ्या नाटक व सिनेमातून विविध पैलूंनी साकारले,' असे उद्गार डॉ. जब्बार पटेल यांनी काढले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त डॉ. पटेल यांची प्रकट मुलाखत शाहू कला मंदिरात घेण्यात आली. यावेळी मसापचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, साहित्यिक किशोर बेडकिहाळ, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष जयेंद्र चव्हाण, नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम, डॉ. शैला कापरे, नगरसेवक रवींद्र झुटिंग, राजू गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. किशोर बेडकिहाळ व स्नेहल दामले यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. पटेल यांनी पंढरपूर या जन्मगावापासूनचा शालेय प्रवास, सोलापुरातील वैद्यकीय शिक्षण, नाटकाची गोडी कशी वाढली व पुण्यात त्याला कसा बहर आला याचे विवेचन केले. विजय तेंडुलकर लिखित 'घाशीराम कोतवाल' या गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन व प्रयोग सादर करताना लागलेला कस, परदेशात या नाटकाचे प्रयोग सादर होताना केवळ एका वाक्यातील चुकीच्या भाषांतराने झालेला प्रेक्षकांचा हलकल्लोळ, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या. 'मला घडविण्यात चाकोरीबाहेरच्या अनेक शिक्षकांचेही मोठे योगदान आहे. मी पुणेकर असल्याचा मला अभिमान आहे. माणूस नावाचे बेट, अशी पाखरे येती यानंतर मी अभिनय बंद करून दिग्दर्शनाकडे वळलो,' असे सांगताना भारतीय रंगभूमीवर वेगळ्या प्रकारे लिहिलेला व सादर केलेल्या 'घाशीराम कोतवाल'च्या यशस्वी वाटचालीच्या आठवणीत डॉ. पटेल रंगून गेले. लतादीदींनी 'सामना'तील मारुती कांबळेच्या खुनाच्या गूढ प्रकरणाला साजेसे असे गायलेले 'सख्या रे घायाळ मी हरिणी' हे 'थीम साँग' तसेच पुढे सिंहासन, सामना, उंबरठा, जैत रे जैत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण-बखर एका वादळाची या मराठी चित्रपटासह हिंदी चित्रपटातील आठवणी डॉ. पटेल यांनी सांगितल्या. मसापचे शाखाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अविनाश कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. नंदकुमार सावंत यांनी आभार मानले. यावेळी विश्वास दांडेकर, संभाजीराव पाटणे, प्रकाश गवळी, डॉ. उमेश करंबेळकर, वजीर नदाफ, प्रमोद कोपर्डे, दिनकर झिंब्रे, डॉ. अच्युत गोडबोले, डॉ. राजेंद्र माने उपस्थित होते. (प्रतिनिधी) साई सावंत मान्यवरांचा सत्कार ■ यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणार्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते द्वितीय वर्धापनदिनानिमित्त विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. शाहूपुरी शाखेचा उपक्रम राज्यस्तरावर चर्चेचा ठरला असल्याचे रवींद्र बेडकीहाळ यांनी सांगितले. मसाप शाहूपुरी शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांची किशोर बेडकिहाळ आणि स्नेहल दामले यांनी प्रकट मुलाखत घेतली. |