राजेंची दिशा... घड्याळाची दशा !
By Admin | Published: January 11, 2017 11:37 PM2017-01-11T23:37:31+5:302017-01-11T23:37:31+5:30
‘रिटर्न आॅफ दि चाणक्य नीती - पार्ट टू’चा भाग बारामतीकरांसाठी सादर.. थोरल्या राजेंची ‘राजधानी एक्सप्रेस’ ट्रॅक बदलण्याच्या मार्गावर..
सचिन जवळकोटे
पक्षातल्या विरोधकांना ऐन निवडणुकीत ‘कामाला लावण्याची परंपरा’ तशी थोरल्या बारामतीकरांनीच जुन्याकाळी सुरू केलेली. साताऱ्याचे थोरले राजे तर त्याहीपेक्षा पुढचे निघाले. राजे जे काही बोलताहेत, त्यावर काय करावे.. हाही प्रश्न. राजे जे काही करताहेत, त्यावर काय बोलावे.. हाही महाप्रश्न. पक्षाची खासदारकी भोगत थेट पक्षनेतृत्वावरच जहरी टीका करण्याचं राजेंचं आततायी धाडस जेवढं वाखाणण्याजोगं, तेवढीच या धाडसाला शांतपणे गोंजारण्याची थोरल्या बारामतीकरांची सहनशीलताही दाद देण्यासारखी. मात्र, दोघांच्या या कल्पनातीत स्वभावामुळं जिल्ह्यातली ‘मनसबदार मंडळी’ पुरती डिस्टर्ब झालीयेत, त्याचं काय? कारण थोरल्या राजेंची ‘राजधानी एक्स्प्रेस’ कोणती दिशा पकडणार, याचा कुणालाच थांगपत्ता लागत नसला तरी ‘पक्षाची दशा’ स्थानिक नेत्यांना पाहवेनाशी झालीय, हे नक्की.
दोन-तीन दशकांपूर्वी ‘हातात हात’ घेऊन राजकारण करणाऱ्या थोरल्या बारामतीकरांचा ‘कामाला लागा’ हा ऐन निवडणुकीतला परवलीचा शब्द भल्याभल्यांच्या उरात धडकी भरवायचा. बड्या-बड्यांची जिरवायचा. आता स्वत:च्या पक्षाची स्थापना झाल्यापासून गेल्या पंधरा-सोळा वर्षांत हेच बारामतीकर ‘निष्ठा’ शब्दाची व्याख्या सर्वांना पटवून देण्यात पूर्णपणे गुंतलेत. मात्र, त्यांची जुनी ‘चाणक्य नीती’ साताऱ्याच्या थोरल्या राजेंनी पुढं गिरवायला सुरू केलीय. आपल्याला वरचढ ठरू पाहणाऱ्या पक्षातल्या प्रत्येक नेत्याची जिरवायची परंपरा छानपैकी राखलीय.. पण ‘धाकट्या पुतण्यावरही कुणाचा तरी वचक हवा,’ या ‘परमार्थिक’ विचारातून आजपर्यंत जपलेला हा जिवंत ‘सातारी बॉम्ब’ आता इथल्या नेत्यांच्या खुर्चीखाली फुटू लागलाय, त्याचं काय?
बारामतीची चाणक्य नीती थोरल्या राजेंनाही पाठ..
सौभाग्यवती पंतांचं नक्षत्राचं देणं
पालिका निवडणूक प्रचारासाठी ‘कमळ’वाले ‘पंत’ थेट मुंबईहून साताऱ्यात आलेले. मात्र, त्यांनी आपल्या सभेत मोठ्या राजेंविषयी ब्र शब्दही काढला नाही. जावळीच्या मेंबरनंच म्हणे, तशी खास सूचना पंतांना केली होती. भविष्यात कदाचित धाकट्या राजेंच्याविरोधात मोठ्या राजेंची साथ मिळू शकते, हाही कयास बांधून ‘कमळ’वाल्यांनी ‘पॉलिटिकल स्ट्रॅटेजी’ आखलेली. विशेष म्हणजे, निकालानंतर ‘सौभाग्यवती पंत’ साताऱ्यात येतात काय अन् ‘नक्षत्राचं देणं’ देऊन जातात काय, सारंच अनाकलनीय अन् धक्कादायक. यामुळंच की काय, ‘थोरल्या राजेंनी दिशा ठरवावी !’ असं ‘काकुळतीचं आव्हान’ चिडलेल्या इतर नेत्यांनी दिलं, पण हाय... त्याचवेळी शेतकऱ्यांचे ‘भाऊ’ लाल दिव्याच्या गाडीत बसून ‘रेस्ट हाउस’वर राजेंना भेटायला गेलेले. त्यापुढचा कहर म्हणजे, लगेच दोन दिवसांनी मोदींच्या नोटाबंदीवर टीका करणारे प्रेमपत्रही राजेंनी टपालातून दिल्लीश्वरांना पाठविलेले ! आता तुम्हीच सांगा... ही त्यांची नेमकी कोणती दिशा?
धाकट्या राजेंचीही घोषणा..
.. ‘आता माझी सटकली !’
घरच्या मैदानातील पालिकेचा पराभव पचवून साताऱ्याचे धाकटे राजे नव्या जोमाने आता झेडपीच्या तयारीला लागलेत. थोरल्या राजेंवर वार करण्याची एकही संधी सोडेना झालेत. अशावेळी बारामतीकरांनी दोघांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी म्हणे चाचपणी केलेली. मात्र, धाकट्या राजेंनी या तहाला स्पष्ट शब्दात नकार दिलाय. ‘पुढचं मैदान माझं आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. त्यामुळं यंदा जे काही आहे, ते होऊनच जाऊ द्या,’ अशा स्पष्ट शब्दात म्हणे तथाकथित मनोमिलनाला त्यांनी ठामपणे विरोध दर्शविलाय. त्यामुळं आज ‘अजिंक्यतारा’वर थोरले बारामतीकर नेमकी काय भूमिका घेणार, हाही कळीचाच मुद्दा.
झेडपी सत्तेची चावी ताब्यात ठेवण्यासाठीच..
थोरल्या राजेंच्या ‘राजधानी एक्स्प्रेस’ला साऱ्याच पक्षांचेच डबे जोडण्याची उभारणी ‘जलमंदिर’च्या फॅक्टरीत युद्धपातळीवर
सुरू झालीय. यंदाच्या निवडणुकीत साऱ्याच पक्षातले असंतुष्ट अन् अतृप्त प्रवासी ‘राजधानी’च्या बोगीत ऐसपैस विसावणार,
यात शंकाच नाही... मात्र याचा सर्वाधिक फटका बारामतीकरांच्या प्लॅटफॉर्मलाच बसणार, हेही शंभर टक्के निश्चित. कारण ‘राजधानी एक्सप्रेस’ची निर्मितीच जणू त्यादृष्टीनं झालीय.
यंदा झेडपीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज बांधला गेलाय. त्यामुळं, ‘सत्तेच्या पाठिंब्याची चावी आपल्याच ताब्यात कशी राहील !’ याची पद्धतशीर आखणी ‘जलमंदिर’वर सुरू झालीय... कारण असं झालं तर पुढची पाच वर्षे ‘आघाडी’च्या पाठिंब्यावर सत्ता दबावाचं राजकारण करायला थोरले राजे अन् त्यांची सर्वपक्षीय टीम मोकळी !
आतूनच फुटताहेत सुरूंग..
गेली दीड दशके अत्यंत अभेद्य राहिलेला बारामतीकरांचा इथला बालेकिल्ला यंदा मात्र चारही बाजूनं घेरला गेलाय. आजपावेतो, या किल्ल्याच्या महाकाय दरवाज्याला धडका देऊन वाईचे दादा कैकवेळा जखमी झाले. मलठणचे‘दादा’ नेतेही घायाळ झाले. निमसोडचे भैय्याही कंटाळून दुसऱ्या छावणीत दाखल झाले. कऱ्हाडचे बाबाही वेळोवेळी हतबल झाले.. पण दरवाज्याला यत्किंचितही तडा गेला नव्हता; मात्र किल्ल्यात राजेंनीच आत गुपचूपणे पेरून ठेवलेले सुरुंग आता धडाधड उडू लागल्याने बहुतांश बुरूज ढासळू लागलेत.
बाहेरून होणारा तोफांचा मारा चुकवावा की आतून फुटणारे सुरुंग टाळावेत, या गोंधळात किल्ल्यातील सारेच हवालदिल झालेत.. म्हणूनच की काय, ‘जलसंधारण’च्या खुर्ची बदलानंतर एकमेकांकडे न पाहणारेही खूप वर्षांनंतर प्रथमच एकत्र आलेत. ‘फलटणचे राजे’ अन् ‘ल्हासुर्णेचे सरकार’ एकत्र येऊन ‘राजेंची दिशा’ या मुद्द्यावर गंभीरपणे चर्चा करू लागलेत. चला... हेही तसं थोडकं म्हणायचं ! वाईटातून कधी-कधी चांगलं घडतं, हेच बारामतीकरांचं भाग्य म्हणायचं!