शिवेंद्रसिंहराजेंसह संचालकांची सिंधुदुर्ग बँकेला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:49 AM2021-09-16T04:49:36+5:302021-09-16T04:49:36+5:30
सातारा : जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची गुणवत्तापूर्ण कार्यप्रणाली तसेच प्रक्रिया ...
सातारा : जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची गुणवत्तापूर्ण कार्यप्रणाली तसेच प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने केली.
राज्यातील उल्लेखनीय कामकाज करीत असलेल्या जिल्हा बँकांपैकी अग्रगण्य असलेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस उपाध्यक्ष सुनील माने, संचालक दत्तात्रय ढमाळ, राजेंद्र राजपुरे, नितीन पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, राजेश पाटील, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, प्रदीप विधाते, अर्जुनराव खाडे, कांचन साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी भेट दिली.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व सर्व संचालक मंडळ यांचे स्वागत केले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राज्यामध्ये उल्लेखनीय कामकाज असून, सभासदांकरिता कमी व्याजदराने कर्ज पुरवठा, विमा संरक्षण, २५६ विकास सेवा सोसायटींमार्फत तळागाळातील शेतकरी, सभासदांना शेती व शेतीपूरक कर्ज पुरवठा, ग्राहकांना सर्वप्रकारच्या अत्याधुनिक बँकिंग सुविधा आदीबाबत सर्वंकष माहिती दिली.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा थेट स्वरुपातील कर्ज पुरवठा, तसेच कृषी वित्त पुरवठा, आणि प्रक्रिया प्रकल्प आदीची पाहणी करण्याकरिता हा दौरा आयोजित केला आहे. याव्यतिरिक्त सहकारी जिल्ह्यातील साखर कारखान्यास सहभाग योजनेंतर्गत कर्ज पुरवठा करण्याचा बँकेचा मानस असल्याचेही यावेळी त्यांनी आवर्जून नमूद केले.
डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील अग्रगण्य असलेल्या बँकांपैकी एक बँक असून, बँकेचा थेट कर्ज पुरवठा, विकास सेवा सोसायटीमार्फत कृषी वित्त पुरवठा, बँकेचा शून्य टक्के एन.पी.ए. आदी बाबी उल्लेखनीय असून, या बँकेच्या काही योजना तसेच मत्स्य शेती प्रक्रिया प्रकल्प आपल्या सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून कार्यान्वित करता येतील.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सर्वंकष माहिती देऊन सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामकाज करीत असलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ यांनी भेट देऊन खूप आनंद झाल्याचे सांगितले. या बँकेने विकासाभिमुख उपक्रम राबविलेले आहेत. सहकार क्षेत्रासाठी ही बाब अत्यंत आदर्श आहे.
फोटो नेम : १५डीसीसी
फोटो ओळ : सिंधुदुर्ग येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व शिष्टमंडळाने भेट दिली.