पणन महासंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, आत्महत्या केल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 04:37 PM2022-10-13T16:37:36+5:302022-10-13T16:38:00+5:30
पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलावरुन नीरा नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची शक्यता
मुराद पटेल
शिरवळ : पणन महासंचालक, पुणे सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (वय ५०, रा. गोखलेनगर, पुणे) हे बेपत्ता झाले आहेत. त्यांनी पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलावरुन नीरा नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिदेंवाडी गावच्या हद्दीतील एका हाँटेलसमोरुन ते बेपत्ता झाल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. निरा नदीपात्रामध्ये युद्धपातळीवर शोध कार्य सुरू असून घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शशिकांत घोरपडे हे आपले मिञ प्रदिप मोहिते यांच्या कारमधून (एमएच-११-सीडब्ल्यू-४२४४) पुणे कार्यालयातून गेले होते. नेहमी कार्यालयातून ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी येत असत. माञ उशिरपर्यंत ते घरी न आल्याने व त्यांचा मोबाईल बंद येत असल्याने त्यांच्या पत्नीने शशिकांत यांच्या बंधूंना याबाबतची कल्पना दिली. त्यांनी कार्यालयात चौकशी केली असता शशिकांत हे साडे तीन वाजण्याच्या दरम्यान कार्यालयातून गेल्याची माहिती मिळाली.
दरम्यान मिञ प्रदिप मोहिते यांच्या मोबाईलवर खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावरुन कार गेल्याचे फास्टटँगचा मॅसेज आल्याने ते साताऱ्याकडे गेल्याचे समजल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान शिदेंवाडी गावच्या हद्दीतील एका कंपनीसमोर संबंधित कार लावल्याचे तेथे चहा पिल्याचे निदर्शनास आले. यावेळी शोधाशोध केली असता शशिकांत घोरपडे यांचा ठावठिकाणा मिळू न शकल्याने श्रीकांत घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरवळ पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
याचदरम्यान, नीरा नदीच्या पात्रालगत सीसीटीव्हीमध्ये एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पूलाकडे जात असल्याचे दिसून आले. यामुळे नेमके कोणत्या व्यक्तीने नदीपात्रात उडी मारली आहे. याबाबत स्पष्टता होत नाही. घटनास्थळी बेपत्ता अधिकाऱ्याचे नातेवाईक यासह पोलीस दाखल झाले आहेत. महाबळेश्वर टेकर्स, शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनचे भोईराज जलआपत्ती यांच्यामार्फत नीरा नदीपाञात शोधकार्य सुरु आहे.