मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य
By admin | Published: November 19, 2014 08:59 PM2014-11-19T20:59:55+5:302014-11-19T23:14:54+5:30
नागरिक त्रस्त : सहा महिन्यांपासून पालिकेची सफाईसाठी टोलवाटोलवी
सातारा : सदर बझार येथील मंदिरासमोरून वाहणारे गटार मागील सहा महिन्यांपासून तुंबून वाहत आहे. यातील सांडपणी मंदिराच्या मैदानात जाऊन मंदिर पसिरात दुर्गंधी पसरली आहे. याविषयी पालिकेला वारंवार कळवूनदेखील पालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे पालिकेला हे काम करता येत नसेल तर आम्ही लोकवर्गणीतून करू, अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे.
सदर बझार येथील हनुमान मंदिरात नेहमी भाविकांची गर्दी असते. मंदिर परिसरात विविध धार्मिक विधीही केले जातात; परंतु सध्या याच परिसरात सांडपाण्याची डबकी साचली आहेत. या डबक्यामध्ये मोकाट डुकरांचे वास्तव्य वाढले आहे. या गटारीतून मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत आहे. परंतु, मंदिर परिसरात गटार तुंबल्याने हे पाणी रस्ता व मंदिर परिसराच्या मैदानातून वाहत आहे. सध्या डेंग्यूची साथ असल्याने या डबक्यांची धास्तीच येथील नागरिकांनी घेतली आहे.
नगरसेवकांपासून पालिका अधिकाऱ्यांनी सांगूनदेखील याची दखल घेतली जात नाही. यामुळे अनेकवेळा येथील नागरिकच या गटाराची स्वच्छता करतात; परंतु याचा काहीही उपयोग होत नाही. यासाठी पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. पालिकेला जर हे काम करता येत नसेल, तर आम्ही लोकवर्गणी काढून हे काम करू, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
एकीकडे हनुमान मंदिर व दुसरीकडे दुर्गामंदिर यांच्या मधोमध ही सांडपाण्याची दलदल आहे. या दोन्ही ठिकाणी भाविक येत असतात. परंतु सध्या भाविकांनाच नाक धरून देवदर्शन घेण्याची वेळ आली आहे. मागील सहा महिन्यांपासून परिसरात दलदल झाली आहे. यामुळेच परिसराला मोठी दुर्गंधी आहे. यामुळे शेवटी आम्ही लोकवर्गणीचा विचार करत आहोत.
- दत्ता शिंदे
मंदिर परिसरात जवळपास पाच-सहा बोअरवेल आहेत. याठिकाणी पंधरा फुटावर पाणी लागल्याने सध्या बोअरमधून सांडपाणीच येत आहे. या बोअरच्या पाण्यातून दुर्गंधीच येत आहे.
- विशाल जाधव
रास्ता रोकोची दखल नाही
पालिका काम करत नाही, डेंग्यूचे रुग्ण सदर बझार येथे आढळला. त्यामुळे पालिकेने आरोग्याच्या दृष्टीने हे काम करावे म्हणून नागरिकांनी मागील आठवड्यात रास्ता रोको केला; परंतु याचीही दखल न झाल्याने नागरिकांनी आता कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न पडला आहे.
४मंदिर परिसरातील दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना नाकाला रुमाल लावाला लागत आहे.