खड्डेमुक्त अन् सोयीनीयुक्त महामार्ग लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:50 AM2019-11-20T00:50:48+5:302019-11-20T00:52:54+5:30
चांगल्या रस्त्यांवरून प्रवास करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. टोल देऊनही असुविधांच्या गर्तेत सापडलेल्या प्रवाशांना खड्डेमुक्त आणि सर्व सोयीनीयुक्त महामार्ग देण्यासाठी पूर्ण तयारी सुरू असून, पुढील दोन आठवड्यांत या रस्त्यांवरील गैरसोयी दूर करण्याचा शब्द रिलायन्सच्यावतीने ‘लोकमत’ कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत देण्यात आला.
सातारा : चांगल्या रस्त्यांवरून प्रवास करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. टोल देऊनही असुविधांच्या गर्तेत सापडलेल्या प्रवाशांना खड्डेमुक्त आणि सर्व सोयीनीयुक्त महामार्ग देण्यासाठी पूर्ण तयारी सुरू असून, पुढील दोन आठवड्यांत या रस्त्यांवरील गैरसोयी दूर करण्याचा शब्द रिलायन्सच्यावतीने ‘लोकमत’ कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत देण्यात आला.
टोल विरोधी चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते, रिलायन्सचे अधिकारी आणि याप्रश्नी न्यायालयात याचिका दाखल करणारे प्रवासी यांची एकत्र बैठक ‘लोकमत’ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी चळवळीचे प्रवर्तक रवींद्र नलवडे, महेश पवार, महारूद्र तिकुंडे, रोहित सपकाळ, महेश महामुनी, रिलायन्सच्यावतीने संकेत गांधी आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे अॅड. राजगोपाल द्रविड आणि अॅड. अमित द्रविड उपस्थित होते.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुर्दशा आणि त्यामुळे होणारे अपघात यांच्या विरोधात सोशल मीडियावर टोल विरोधी जनता ही चळवळ सामान्य सातारकरांनी सुरू केली. लोकहिताचे मुद्दे घेऊन सुरू झालेल्या या चळवळीला ‘लोकमत’ने खंबीर साथ देत विविध स्तरांवर हे प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न केले. ‘असुविधांचा महामार्ग’ नावाने सलग आठ दिवस खेडशिवापूर ते हुबळी महामार्गाची वस्तुस्थिती सांगणारी वृत्तमालिका प्रसिद्ध केली. या वृत्तमालिकेमुळे सर्वसामान्यांमध्ये जनजागृती झाली.
टोल विरोधी जनता चळवळीच्यावतीने महामार्गावरील असुविधांचा पाढा वाचण्यात आला. महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून काम जैसे थे स्थितीत आहे. पावसाळ्यात फक्त खड्डेच होते, आता तर खड्डे आणि धूळ यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. महामार्गाला जुळणाऱ्या सेवारस्त्याला आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर नाहीत. त्यामुळे वेगाने येणाºया गाडीला वाहने दिसत नसल्याने अपघात होत असल्याची माहिती यावेळी टोल विरोधी जनता चळवळीच्या सदस्यांनी दिली. कित्येकदा अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध न होणं, तत्काळ सेवेसाठी संपर्क न होणं, टोल वसुलीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन आदी बाबी मांडण्यात
आल्या.
अॅड. राजगोपाल द्रविड यांनी टोलनाक्यावरून येणारी-जाणारी वाहने, गोळा होणारा टोल, त्या रकमेतून करण्यात येणारी देखभाल दुरुस्तीची कामे याविषयीची माहिती टोलनाक्यांवर स्पष्टपणे निर्देशित करण्याची सूचना मांडली. त्याबरोबरच स्वच्छतागृहांची अवस्था, सेवा रस्त्याची सोय या बाबी जर दिल्या तर टोल देण्यास कोणाचाच विरोध नाही; पण कोणत्याही सुविधा न देता केवळ टोल वसूल केला जात असेल तर आपण तो देणार नाही. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पुढील पंधरा दिवस ते महिनाभरात सुधारणा न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही द्रविड यांनी सांगितले.
रिलायन्सच्यावतीने बाजू मांडताना संकेत गांधी यांनी पुढील पंधरा दिवसांत महामार्ग खड्डेमुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याबरोबरच येथून प्रवास करणाºयांनी रस्त्यावरील गैरसोयींबाबत तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करून भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासित केले. प्रवाशांच्या सोयीसाठी आम्ही प्रयत्न करत असून, पावसामुळे महामार्गाची दुरुस्ती करता येत नव्हती. आता युद्धपातळीवर काम सुरू झाले असून, महामार्गावर खड्डा राहणार नाही. त्याबरोबरच महामार्ग एका लेव्हलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. भविष्यात फास्ट टॅगची व्यवस्था होत असल्यामुळे कोणालाही रांगेत उभे राहावे लागणार नाही. त्यामुळे वाद आणि इतर प्रसंग उद्भवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.