सातारकरांचे पाण्यासाठी 'बोंबाबोंब आंदोलन', अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजण्याचा इशारा
By सचिन काकडे | Published: April 26, 2023 03:28 PM2023-04-26T15:28:36+5:302023-04-26T15:41:07+5:30
संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंता यांना धरले धारेवर
सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, सलग तीन आठवडे गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील रहिवाशांनी बुधवारी सकाळी पालिकेत येऊन बोंबाबोंब आंदोलन केले. नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास सहा मे रोजी अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजू, असा इशारा यावेळी नगर विकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी प्रशासनाला दिला.
गेल्या महिनाभरापासून सातारा शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच
शहराच्या पश्चिम भागात वारंवार गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे.
वारंवार सूचना, निवेदने देऊन पाणीपुरवठ्यात कोणताही फरक पडलेला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी नगर विकास आघाडीचे माजी नगरसेवक अविनाश कदम, पक्षप्रतोद अमोल मोहिते यांच्यासह रामाचा गोट, मंगळवार पेठ, होलार गल्ली भागातील नागरिकांनी पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे यांच्यासमोर प्रश्नांची सरबत्ती केली.
यावेळी शहर अभियंता दिलीप चित्रे यांनी प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, फिल्टर बेडची स्वच्छता केल्यानंतर पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकावी लागते. या पावडरमुळे पाण्याचा रंग काहीसा पिवळसर होतो. याचा अर्थ ते पाणी दूषित आहे असे नाही. असे सांगत त्यांनी समोरच्या बाटलीतील पिवळसर पाणी नागरिकांना पिऊनच दाखवले. यानंतर नागरिकांचा विरोध शांत झाला.
दरम्यान, पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा, अन्यथा सहा मे रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा अविनाश कदम यांनी दिला.