कपडे धुण्यासाठी गेलेल्या अपंग महिलेचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:45 AM2021-08-13T04:45:17+5:302021-08-13T04:45:17+5:30
वाई : बोपर्डी गावच्या हद्दीत असणाऱ्या किवरा ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेली अपंग महिला वाहून गेली. ही घटना गुरवारी सकाळी ...
वाई : बोपर्डी गावच्या हद्दीत असणाऱ्या किवरा ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेली अपंग महिला वाहून गेली. ही घटना गुरवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
सारिका जयवंत पवार (वय ३३, रा. बोपर्डी) असे वाहून गेलेल्या अपंग महिलेचे नाव आहे. वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, गुरुवार, दि. १२ रोजी सकाळी ११.३० वाजता सारिका पवार व तिचा मुलगा रोहन पवार हे दोघे बोपर्डी गावाजवळील किवरा ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेले असता, कपडे धुऊन झाल्यानंतर सारिका केस धुण्यासाठी पाण्यात उतरल्या असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन खोल डोहात बुडाली. बरोबर असणाऱ्या मुलाने आरडओरड करण्याचा प्रयत्न केला; परंतु पाणी खोल असल्याने त्याला तिला वाचविता आले नाही, तसेच ती एका हातापायाने अपंग असल्याने पोहता आले नाही. मुलाने त्वरित मामा शंकर फडतरे यांना घटनेची कल्पना दिली. दरम्यान, वस्तीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत. याबाबत तिचा भाऊ शंकर फडतरे (वय ४०, रा. बोपर्डी) यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.