ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब; सातारकरांना दिलासा, किमान तापमान २० अंशावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 03:38 PM2024-12-03T15:38:45+5:302024-12-03T15:39:10+5:30

मागील १० दिवस तर कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम झाला होता

Disappearance of cold due to cloudy weather; Minimum temperature 20 degrees in Satara | ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब; सातारकरांना दिलासा, किमान तापमान २० अंशावर

ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब; सातारकरांना दिलासा, किमान तापमान २० अंशावर

सातारा : जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ झाली असून बहुतांशी भागाचा पारा २० अंशावर आहे. यामुळे थंडी गायब झाली आहे. त्यातच ढगाळ वातावरण तयार झाल्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नोव्हेंबर महिना जिल्ह्यासाठी कडक थंडीचा ठरला. कारण, मागील काही वर्षात कधीच नोव्हेंबर महिन्यातील किमान तापमान ११ अंशाच्या खाली आले नव्हते. पण, यावर्षी महाबळेश्वर शहरात नोव्हेंबरमध्येच १०.५ हा नीच्चांकी पारा ठरला. तर सातारा शहरात सर्वात कमी ११.८ अंश तापमानाची नोंद झालेली. हेही नाेव्हेंबर मधील मागील अनेक वर्षांतील नीच्चांकी किमान तापमान ठरले. यामुळे सातारा जिल्ह्यात १५ दिवस थंडीचे होते. त्यातील १० दिवस तर थंडीची तीव्रता अधिक होती. यामुळे जनजीवनावरही परिणाम झालेला. तसेच शेतीच्या कामावर आणि बाजारपेठेवरही परिणाम झाला होता. पण, रविवारपासून किमान तापमानात वाढ होत गेली. त्यामुळे थंडी गायब झाली आहे.

सातारा शहरात सोमवारी २१.५ किमान तापमानाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत सहा अंशांनी वाढ झाली आहे. तसेच महाबळेश्वरचा पाराही वाढून १६.४ अंशावर पोहोचला. यामुळे महाबळेश्वरातही थंडी कमी झाली आहे. त्यातच दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. यामुळे अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. सातारा शहरातही सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झालेले होते.

Web Title: Disappearance of cold due to cloudy weather; Minimum temperature 20 degrees in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.