आपत्ती व्यवस्थापन कक्ष केवळ लॅण्डलाईन पुरता!
By admin | Published: June 23, 2015 11:58 PM2015-06-23T23:58:42+5:302015-06-24T00:46:01+5:30
पाटण : बैठका घेऊनही फायदा नाही
अरुण पवार - पाटण -जिल्ह्यात पाटण तालुका म्हटलं की, पाऊस, पूर, भूकंप या आपत्तींनी बाधित तालुका होय. यापूर्वीचे अनुभव व आलेली संकटे पाहता प्रशासनाच्या दृष्टीने अलर्ट राहण्याचे दिवस. तशा सूचना पावसाळा सुरू होण्याअगोदर जिल्हाधिकारी, आमदार, तहसीलदार यांनी खास बैठका घेऊन दिलेल्या आहेत. मात्र पाटण तालुक्यातील यंत्रणा मनावर घेताना दिसत नाही. १ जूनपासून प्रत्येक शासकीय विभागात उघडण्यात आलेले आपत्ती व्यवस्थापन कक्ष केवळ एक लॅण्डलाईन फोनपुरते तेदेखील रजेदिवशी बंद, तसेच तालुक्यात १३ आरोग्य केंद्रे व ६३ उपकेंद्रे असून, कितीही जीव तोडून सांगा; मात्र डॉक्टर मुक्कामी राहत नाहीत. आरोग्य कर्मचारी थांबायला तयार नाहीत. तलाठी, ग्रामसेवकांना तर आपत्तीचे घेणे-देणे नाही. त्यामुळे केवळ कागदोपत्री आढावे व बैठका काय कामाच्या? आपत्तीवेळी मदतच मिळत नाही, हे विदारक सत्य तालुक्यातील दुर्गम जनतेला ज्ञात आहे.
गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण पाटण तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. रस्त्यावरची गावे आणि तेथील लोक अशा पावसातून आपली मूलभूत गरज, बाजारहाट किंवा संपर्क साधतात. मात्र, तालुक्यातील अनेक गावे जंगलात व दुर्गम, डोंगराळ भागात आहेत.
तिथे मुसळधार पावसामुळे जनजीवन चांगलेच गारठले आहे. तेथील लोकांना घराबाहेर पडता येत नाही.
त्यातच वीजपुरवठा खंडित झालेला तो ७२ तास उलटले तरी सुरळीत होत नाही. आजारी माणसाला दवाखान्यात न्यावे तर अशक्यच. कारण जवळपासच्या आरोग्य केंद्रात वेळेवर नसतात. रात्रीच्या वेळी तर दुर्गम भागातील लोकांवर पावसाळ्यात अनेक संकटे येतात.
सांगायचे कोणाला, कुणीही मदतीला मदतीला येत नाही. कोयना, मोरणा, ढेबेवाडी विभागातील गावांची पावसाळ्यात अत्यंत वाईट अवस्था असते. गावात आपत्तीकाळात शासकीय यंत्रणा उपलब्ध नसते; मग आरोग्य, वीज किंवा अन्नधान्य मिळत नाहीत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आहे तरी कुठे?
या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आहे का?
तालुक्यातील निवी, कुसणी, पळशी, पाणेरी, पांढरेपाणी, हुंबरणे, पाचगणी, मळ्याचा वाडा, मळे-कोळणे, जाईचीवाडी, कारवट, घाणबी वाटोळे, गावडेवाडी, धुईलवाडी, खुडूपलेवाडी, भारसाखळे, जुंगटी, आरल, पिनीत्यावाडा, नेचल, कामरगाव, घाटमाथा, केमसे, भाटोली जोगेटेक अशा अनेक गावांचे पावसाळ्यात काय हाल होतात. याचा आढावा आपत्ती व्यवस्थापनास आहे का? असा सवाल व्यक्त होत आहे.