कोयनेतून ४९ हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:37+5:302021-07-30T04:40:37+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यातच धरणात ९० टीएमसीवर साठा ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यातच धरणात ९० टीएमसीवर साठा असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी सकाळी साडे पाच फुटांवरून दरवाजे ९ फुटांपर्यंत उचलण्यात आले. त्यामुळे ४७ हजार क्युसेक वेगाने पाणी विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयनेतून एकूण ४९ हजार ३४४ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यात धुवाँधार पाऊस झाला. कोयना, नवजा, महाबळेश्वर तापोळा, बामणोली भागात धो-धो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर ओढे, नाले भरून वाहिल्याने कोयना धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. अवघ्या २४ तासांत साडे सोळा टीएमसी पाणी वाढण्याचाही विक्रम नोंद झाला. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत कोयना धरणातील साठा ९० टीएमसीच्या वर पोहोचला. त्यापूर्वीच धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू होता. पाऊस वाढल्यानंतर धरणाचे सहा दरवाजे १० फुटापर्यंत दरवाजे उचलण्यात आले होते. त्यानंतर पाण्याची आवक कमी झाल्याने साडे पाच फुटांपर्यंत दरवाजे खाली घेण्यात आले. गेले पाच दिवस दरवाजे साडे पाच फुटांवर स्थिर होते. पण, पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, धरणातही आवक होत आहे. तसेच साठा ९० टीएमसीवर असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दरवाजे ९ फुटांपर्यंत उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास धरणाचे सर्व दरवाजे ९ फुटापर्यंत उघडण्यात आले. त्यामधून ४७,२४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पायथा वीजगृह २,१०० असा मिळून ४९,३४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात जात होता. यामुळे कोयना नदीची पाणीपातळी वाढली आहे. पूर आल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील इतर धरणांतीलही पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४३ मिलिमीटर पाऊस झाला. यावर्षी आतापर्यंत ३००७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजाला २० आणि जूनपासून आतापर्यंत ३,८२० मिलिमीटर पाऊस पडला आहे. तसेच महाबळेश्वरला सकाळपर्यंत ४६ आणि आतापर्यंत ३,८८१ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
चौकट :
जिल्ह्यातील धरणांतून होणारा विसर्ग
धोम धरणातून ४,०१२ क्युसेक विसर्ग सुरू होता. कण्हेर ४,०९४, बलकवडी ३८६, उरमोडी २,९१९ आणि तारळी धरणातून १,५३२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दरम्यान, धोम धरणात ७५.५८ टक्के पाणीसाठा झाला होता. कोयनेत ८५.२४, बलकवडी ८६.६६, उरमोडी धरण ७४.३५ आणि तारळी धरणात ८५.७० टक्के पाणीसाठा झाला होता.
...........................................................