धरणांमधून विसर्ग सुरूच; जिल्ह्यात पूरस्थिती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:37 PM2020-08-18T12:37:40+5:302020-08-18T12:38:50+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १३८, नवजा १३१ आणि महाबळेश्वरला ७४ मिलिमीटर पाऊस झाला. तर पाण्याची आवक होत असल्याने प्रमुख धरणांतून विसर्ग सुरूच आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १३८, नवजा १३१ आणि महाबळेश्वरला ७४ मिलिमीटर पाऊस झाला. तर पाण्याची आवक होत असल्याने प्रमुख धरणांतून विसर्ग सुरूच आहे. यामुळे नद्यांची पूरस्थिती कायम आहे. तर कोयनेचे दरवाजे १० फुटांवर स्थिर असून धरणातून ऐकूण ५६ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३८ तर जूनपासून आतापर्यंत ३५९० मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला ७४ आणि आतापर्यंत ३९८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत १३१ आणि आतापर्यंत ४०८१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे.
मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास कोयना धरणात २६३२७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० आणि धरणाचे ६ दरवाजे १० फुटांनी उचलून त्यातून ५३८५८ असा ५५९५८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर धरणात ९२.२७ टीएमसी ऐवढा साठा होता. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
धरणक्षेत्रात जोर ओसरला...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सर्वच प्रमुख व मोठी धरणे आहेत. या धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर होता. पण, सोमवारी रात्रीपासून पाऊस कमी झाला आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धोम धरणक्षेत्रात अवघा ६ मिलिमीटर पाऊस झाला. तर कण्हेर धरण १३, उरमोडी १८, बलकवडी आणि तारळी धरणक्षेत्रात प्रत्येकी ४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर प्रमुख सहा धरणांमधून विसर्ग सुरूच आहे. सकाळी धोममधून ११६१ क्यूसेक पाणी सोडले जात होते. तर कण्हेरमधून ७०३८, उरमोडी ४३३० आणि तारळी धरणातून २६२६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.