कोयना धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 08:19 PM2020-10-01T20:19:24+5:302020-10-01T20:21:28+5:30
Koyna Dam, satara news, rain सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी पर्जन्यमान कमी असून कोयना, नवजा परिसरात तर चार दिवसांपासून उघडीप आहे. त्यामुळे कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजानंतर पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी पर्जन्यमान कमी असून कोयना, नवजा परिसरात तर चार दिवसांपासून उघडीप आहे. त्यामुळे कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजानंतर पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी दमदार पाऊस झाला होता. मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू झाला असलातरी जुलै महिन्यापासून सतत कोसळत होता. आॅगस्ट महिन्यातही दमदार पाऊस झाला. त्यामुळे जवळपास सर्वच धरणे भरली. त्यामुळे सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागलेला. त्या तुलनेत यंदा पर्जन्यमान कमी राहिले आहे.
यावर्षी जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पण, त्यानंतर पावसात खंड पडत गेला. जुलै महिन्यात तर तुरळक पाऊस झाला. तर आॅगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्याने धरणे भरू लागली. मात्र, गतवर्षीपेक्षा यंदा पश्चिम भागात पाऊसमान कमी राहिले आहे.
त्यामुळे धरणांमधून गतवर्षीसारखा विसर्ग झाला नाही. त्यातच चार दिवसांपासून पश्चिम भागात पावसाची उघडीप कायम आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक कमी झालेली आहे.
गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर येथे काहीही पाऊस झाला नाही. मात्र, कोयनेला यावर्षी आतापर्यंत ४३३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजाला जूनपासून ५०५७ आणि महाबळेश्वरला ५००५ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
कोयनेत १०५.१४ टीएमसी साठा...
कोयना धरणात पाण्याची आवक कमी आहे. सकाळच्या सुमारास धरणात १०५.१४ टीएमसी साठा होता. तर धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंदच ठेवण्यात आलेला आहे. तर बुधवारी रात्रीच्या सुमारास पायथा वीजगृहातील विसर्गही थांबविण्यात आला.