धरणं नाही भरलं, तरीही सिंचनासाठी पाणी सोडलं; सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू

By नितीन काळेल | Published: August 28, 2023 12:59 PM2023-08-28T12:59:47+5:302023-08-28T13:00:08+5:30

सातारा : ऑगस्ट महिना संपत आलातरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे पूर्व बाजुला दुष्काळाची स्थिती असून पश्चिमेकडील ...

Discharge of water from major dam in Satara district has started | धरणं नाही भरलं, तरीही सिंचनासाठी पाणी सोडलं; सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू

धरणं नाही भरलं, तरीही सिंचनासाठी पाणी सोडलं; सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू

googlenewsNext

सातारा : ऑगस्ट महिना संपत आलातरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे पूर्व बाजुला दुष्काळाची स्थिती असून पश्चिमेकडील धरणेही पूर्ण भरलेली नाहीत. अशातच सिंचनासाठी पाण्याची मागणी असल्याने प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणे भरणार कधी असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम, कण्हेर, तारळी, बलकवडी, उरमोडी आणि कोयनासारखे मोठे धरण प्रकल्प आहे. या धरणांची पाणी साठवण क्षमता ही १४८ टीएमसीवर आहे. या धरणातील पाण्यावरच अनेक गावच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच याच धरणातून सिंचनासाठीही पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यात ही धरणे भरण्याची आवश्यकता असते. तरच तरतुदीनुसार पाणी विसर्ग करताना अडचणी येत नाहीत. 

मात्र, यंदा जिल्ह्यातच पावसाचे प्रमाण कमी राहिलेले आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही अपुरा पाऊस झालेला आहे. त्यातच सध्या बहुतांशी भागात पावसाची दडी आहे. प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठाही वाढेना अशी स्थिती आहे. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी काही दिवस पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे पाणी प्रकल्प भरणार का याविषयीही साशंकता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोयना आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणात सध्या ८६.३५ टीएमसी पाणीसाठा आहे. म्हणजेच धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यातच सध्या धरणक्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. सध्या धरण भरले नसतानाच सांगली जिल्हा जलसंपदा विभागाकडून सिंचनासाठी मागणी झाली. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू करण्यात आली आहेत. त्यातून २१०० क्यूसेक पाणी विसर्ग सांगलीतील जलसिंचनासाठी करण्यात येत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी कमी होत आहे. त्याचबरोबर इतर धरणातूनही विसर्ग करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील कोयना धरणाबरोबरच धोम, कण्हेर आणि उरमोडी धरणातूनही सिंचनासाठी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. सध्या यातील कोयना धरण ८२ टक्के भरलेले आहे. तर धोम धरण ८४ टक्के, कण्हेर ८१.३९ आणि तारळी धरण ९१.६५ टक्के भरलेले आहे. सर्वात कमी पाणीसाठा उरमोडी धरणात ६०.८५ टक्के आहे. हे धरण भरण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. तरच उरमोडी यंदा भरणार आहे.

नवजाला ६० मिलीमीटर पाऊस...

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरुच आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद नवजाला ६० मिलीमीटरची झाली. त्यानंतर कोयनानगर येथे ४७ आणि महाबळेश्वरला ४० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. नवजाचे पर्जन्यमान पाच हजार मिलीमीटरच्या उंबरठ्यावर आहे.

Web Title: Discharge of water from major dam in Satara district has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.