कण्हेरमधून पाण्याचा विसर्ग; संपर्क तुटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:22 AM2021-07-24T04:22:48+5:302021-07-24T04:22:48+5:30
किडगाव : सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना वरदान ठरत असलेले कण्हेर धरण शुक्रवारी भरण्याच्या मार्गावर असल्याने पाणी पातळी नियंत्रित ...
किडगाव : सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना वरदान ठरत असलेले कण्हेर धरण शुक्रवारी भरण्याच्या मार्गावर असल्याने पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी धरण प्रशासनाकडून गुरुवारी रात्री धरणाचे चारही दरवाजे एका फुटाने उचलून वेण्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीपात्रातील पाणी वाढ झाल्याने किडगाव-हमदाबाज या गावांना जोडणारा पूल व करंजे आणि म्हसवे गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने या दोन्ही पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली असून, अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटला आहे.
या परिसरात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत होते. भात आणि सोयाबीनच्या पिकांनी माना टाकल्या होत्या. अशा अवस्थेत शेतकरी चिंतातूर झालेला असतानाच बुधवारी दुपारपासून कण्हेर, मेढा, महाबळेश्वर आणि किडगाव परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाल्याने कण्हेर धरणात पाण्याचा साठा वाढू लागला. सद्य स्थितीत धरण ६९.२२ टक्के भरले असून, धरणात १३९१२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरा धरणाच्या चारही दरवाजांतून वेण्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. किडगाव-हमदाबाज पूल पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून, दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच करंजे आणि म्हसवे गावांना जोडणारा वेण्णा नदीवरील पूलसुद्धा पाण्याखाली गेल्याने या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गावांच्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याने मोठी अडचण झाली आहे.
चौकट..
ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले...
गतवर्षी याच दिवशी कण्हेर धरण ४३ टक्के भरले होते, तर यावर्षी लवकर धरण भरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. गेली दोन दिवस या परिसरात संततधार पडत असल्याकारणाने धावडशी-पिंपळवाडी-नेले डोंगर परिसरातील सर्व छोटे-मोठे पाझर तलाव भरून ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने वेण्णा नदीच्या पाणीपातळीत गुरुवारी सकाळपासूनच प्रचंड वाढ झाली होती.
चौकट..
सातारा-मेढा मार्गावर वाहतूक धिम्या गतीने
मेढा-केळघर रस्ता बंद असून, चिंचणी गावाजवळही रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सातारा-मेढा मार्गावरील वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. भात पिकासाठी हा पाऊस उपयुक्त असून, वेळे कामठी, कुसुंबी, मेढा परिसरात भात लागणीला वेग आला असून, शेतकरीवर्ग शेतीच्या कामात मग्न झालेला दिसत आहे.
फोटो आहे..
२३किडगाव०१/०२
कण्हेर धरण प्रशासनाकडून गुरुवारी रात्री धरणाच्या चारही दरवाजांतून वेण्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
कण्हेर धरण प्रशासनाकडून गुरुवारी पाणी सोडल्याने किडगाव (ता. सातारा) येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.