ढेबेवाडीतील बेशिस्त पार्किंगला शिस्तीचा डोस गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:49 AM2021-02-20T05:49:11+5:302021-02-20T05:49:11+5:30
ढेबेवाडी ही विभागातील मध्यवर्ती बाजारपेठ आहे. विभागातील जनतेला दैनंदिन व्यवहारासाठी या बाजारपेठेतच यावे लागते. शासकीय कार्यालये, बँका, ...
ढेबेवाडी ही विभागातील मध्यवर्ती बाजारपेठ आहे. विभागातील जनतेला दैनंदिन व्यवहारासाठी या बाजारपेठेतच यावे लागते. शासकीय कार्यालये, बँका, वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा व अन्य अनेक सेवा उपलब्ध असल्याने ही बाजारपेठ नित्य गजबजलेली असते. ढेबेवाडी विभाग डोंगरी व दुर्गम विभाग असल्याने अनेक गावांतून दुचाकी व तसेच खासगी चारचाकी वाहनाने बाजारपेठेत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वहातुकीच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला रिकाम्या जागेय वाहने पार्किंग करूनच बाजारपेठेत जावे लागते.
ढेबेवाडी बसस्थानकासमोर कराडकडे पाटणकडे, तसेच सणबूर-जिंती विभागाकडे व बाजारपेठेत जाणारा असे सर्व रस्ते जोडणारा चौक तयार झाला आहे. या रस्त्यावर पादचाऱ्यांची व ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ कायम असते. दर मंगळवारी ढेबेवाडीचा आठवडा बाजार भरतो, हजारोच्या संख्येने ग्राहक व व्यापारी या बाजारांत दाखल होतात, बाजार प्रशस्त बाजारतळावर भरत असला तरीही बाजारात जाणारे ग्राहक, व्यापारी आपली वाहने बसस्टँड परिसरात मुख्य रस्त्यावरच पार्किंग करून जातात. पण ते पार्किंग बेशिस्त व अस्ताव्यस्त असते.
या बेशिस्तीमुळे स्थानिक रहिवासी, प्रवासी व वाहनांच्या रहदारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातून काही वेळा संघर्षाचे व हमरीतुमरीचे प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे या बेशिस्त पार्किंगला शिस्त लावणार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ढेबेवाडी पोलिसांनी यावर उपाय करण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी उपाययोजना करून ते न पाळणारांना शिस्तीचा एक छोटासा, पण जालीम डोस पाजण्याची वेळ आली आहे, असे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना वाटते.
कोट...
ढेबेवाडी ही विकसनशील बाजारपेठ आहे. येथील वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता आता पोलिसांनीच मुख्य रस्त्यावर सम-विषम तारखेला पार्किंग, तसेच ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावून वाहतूक आणि पार्किंगला शिस्त लावावी अशी अपेक्षा आहे.
-अभिजित पाटील
सचिव, सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस
---
फोटोओळ : ढेबेवाडी बसस्थानक परिसरात बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांची रांग व वाहतुकीसाठी शिल्लक थोडासा रस्ता.