‘दादां’च्या दौऱ्याने अनेकांना भरलाय ताप, चंद्रकांत पाटलांच्या दौऱ्याची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:02 AM2018-09-21T01:02:50+5:302018-09-21T01:06:25+5:30
भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी कऱ्हाड दक्षिणचा दौरा केला. त्यांचा हा दौरा त्यांनी जरा उरकताच घेतला. त्यामुळे रात्री एका सभागृहात आयोजित केलेला संवाद मेळावा
प्रमोद सुकरे ।
कऱ्हाड : भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी कऱ्हाड दक्षिणचा दौरा केला. त्यांचा हा दौरा त्यांनी जरा उरकताच घेतला. त्यामुळे रात्री एका सभागृहात आयोजित केलेला संवाद मेळावा झालाच नाही. दादांच्या तब्बेत बरोबर नाही. त्यांना ताप भरलाय, अशी चर्चा होतीच. त्यामुळे त्यांनी आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडे प्रयाण केले खरे; पण त्यांच्या या दौऱ्याने विरोधकांसह काही स्वकीयांनाही ताप भरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारा जिल्ह्याला भाजपने लक्ष्य केलेले दिसते. त्याचाच भाग म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सलग तीन दिवसांचा जिल्हा दौरा केला. बुधवारी दुपारी ते कºहाडला आले. सकाळपासूनचे रखडलेले कार्यक्रम त्यांनी घाईगडबडीतच पूर्ण केले. त्यानंतर या दौºयात अनेकजण त्यांना भेटले. तर ते स्वत: अनेकांना भेटले. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याने विरोधकांना चांगलाच ताप भरल्याची चर्चा.
शिवाय या दौºयात त्यांनी स्वकीयांनाही या दौºयात कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे. शिवाय कºहाडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आयोजित केलेल्या भव्य युवक मेळाव्यात त्यांनी ‘गुगली’ टाकत राजेंद्र यादव यांना भाजप नक्कीच ताकद देईल, असे सांगतानाच येथे भाजपच्या नगराध्यक्षा आहेत. तुम्हीही या प्रवाहात आलात तर विकास गतीने होईल, असे मी त्यांना म्हटले होते. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर जयवंत पाटील यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी प्रीतिभोजन होऊन यादव-पाटलांनी आपला निर्णयही मला सांगितला. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकताच बाकी असल्याचे त्यांनी सांगून टाकले. आपल्या भविष्यातील राजकीय डावपेचातील काही पत्ते मंत्री पाटील यांनी ‘ओपन’ केल्याने अनेकांना चांगलाच ताप भरल्याची चर्चा आहे.
काहींची दांडी, काही सुरक्षित अंतरावर
मंत्री पाटील यांच्या या दौºयात कऱ्हाड पालिकेने कोल्हापूर नाक्यावर उभारलेल्या यशवंतराव चव्हाण स्वागत कमानीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते घेतले. या कार्यक्रमाला शेखर चरेगावकर, डॉ. अतुल भोसले यांच्यासह मान्यवरांचीही उपस्थिती होती. भाजपच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आघाडीचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची उपस्थिती ओघाने आलीच; पण विरोधी लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांनी याकडे पूर्णपणे पाठ फिरवली. भाजपचेही काही नगरसेवक कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसले नाहीत. तर यशवंत जनशक्ती आघाडीच्या काही नगरसेवकांनीही येथे दर्शन दिले नाही. तर उपस्थित असणारे काही नगरसेवक सुरक्षित अंतरावरच दिसत होते.
सुप्त संघर्ष मिटल्याची चर्चा
कऱ्हाड शहरात पावसकर व यादव या दोघांचे स्वतंत्र गट कार्यरत आहेत. पण त्यांच्यात काही वर्षांपासून सुप्त संघर्षही दिसतोय. शिवजयंती मिरवणुकीवेळीही तो अनेकांना दिसून आलाय. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या दौºयानंतर या दोघांतील हा सुप्त संघर्ष मिटल्याची चर्चा आहे.
चंद्रकांतदादा जयंतकाका भेटीचीही चर्चा
मंत्री पाटील यांच्या दौºयातील एक कार्यक्रम येथील गजानन हौसिंग सोसायटीत झाला. सोसायटीला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सोसायटीतील नागरिक सांगत असले तरी या सोसायटीचे चेअरमन हे कºहाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील हे आहेत. हे नजरेआड करता येणार नाही. या कार्यक्रमात काकांनी दादांचे स्वागत केले. व काही विषयांवर चर्चाही केली. भले ती सोसायटीच्या प्रश्नांबाबत असेल; पण राजकीय वर्तुळात याची वेगळीच चर्चा आहे.
उदयनराजेंच्या गैरहजेरीचीही चर्चा
राजेंद्र यादव हे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे यादवांचा वाढदिवस आणि राजेंची हजेरी हे जणू समीकरणच बनले होते. मात्र, या समीकरणाला बुधवारी छेद गेला. त्यामुळे यादवांच्या युवक मेळाव्याला उदयनराजे का अनुपस्थित राहिले, याचीही चर्चा सुरू आहेच.
पटवेकरांचं दर्शनच नाही
स्वीकृत नगरसेवक पदाची लॉटरी लागावी म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणारे फारुख पटवेकर बुधवारच्या पाटलांच्या दौऱ्यात कुठेच दिसले नाहीत. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी झालेल्या प्रीतिभोजनावेळी पटवेकर सपत्नीक उपस्थित होते. तेथेच त्यांना चंद्रकांत पाटील यांनी स्वीकृत नगरसेवक करण्याचा ग्रीन सिग्नल दिला होता. मात्र, आता भाजपच्या माध्यमातून मेहरबान झालेले पटवेकर मंत्री पाटलांच्या दौºयात कुठेच न दिसल्याने याची चर्चा तर होणारच.
सुरेखा पाटलांनीही घेतली चंद्रकांतदादांची भेट
विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या समर्थक असणाऱ्या पंचायत समिती सदस्या असणाºया सुरेखा पाटील यांनीहीसोमवार पेठ येथे एका कार्यक्रमाच्या ठिकाणी मंत्री पाटील यांची भेट घेतली. एवढेच नव्हे तर त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरही त्या दिसत होत्या.