जिल्हा परिषदेत पेन्शनधारकाच्या प्रश्नावर चर्चा
By प्रगती पाटील | Published: September 1, 2023 07:55 PM2023-09-01T19:55:57+5:302023-09-01T19:56:05+5:30
अधिकाऱ्यांची उपस्थिती : अनेक प्रलंबित प्रश्नांचा निपटारा
सातारा : साताराजिल्हा परिषदेत शुक्रवारी पेन्शन अदालत झाली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली. तसेच काही प्रश्नांचा निपटाराही करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली ही पेन्शन अदालत झाली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे, जिल्हा कृषि विकास अधिकारी विजय माईनकर, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अविनाश देशमुख, लेखाधिकारी संदीप निंबाळकर आदींसह सेवानिवृत्त संघटनांचे प्रतिनिधी, पेन्शनधारक उपस्थित होते.
पेन्शन अदालतीमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागातून सेवानिवृत्त होणाऱ्या पेन्शनर्स कर्मचाऱ्यांना पेन्शनविषयक येणाऱ्या अडीअडचणीचे व समस्यांचे निराकरण करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी पेन्शनविषयक तसेच गटविम्यासह विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. सेवानिवृ्त्त कर्मचाऱ्यांनी पेन्शन दरमहा १ तारखेला मिळावी, पंचायत समिती स्तरावर पेन्शन अदालत घेण्यात यावी. अंशराशीकरण, उपदान, भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण, गटविमा आदी लाभ लवकर मिळावेत अशा मागण्या केल्या. सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष जोर्वेकर यांनी सेवानिवृत्तांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद प्रशासन सकारात्मक निर्णय घेत असल्याने संघटनेच्यावतीने अभिनंदन केले.