पवारांच्या गुगलीची पाटणमध्ये चर्चा

By admin | Published: January 14, 2016 10:11 PM2016-01-14T22:11:38+5:302016-01-15T00:17:44+5:30

विक्रमसिंह पाटणकरांना श्रेय : लोकनेत्यांच्या कारकिर्दीचे पोस्टमार्टम

Discussion of Pawar's googly in Patan | पवारांच्या गुगलीची पाटणमध्ये चर्चा

पवारांच्या गुगलीची पाटणमध्ये चर्चा

Next

पाटण : राष्ट्रीय नेते आणि यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या पाटण दौऱ्यात त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या उत्तरार्धाच्या शेवटच्या टप्प्यात पाटण तालुक्याचे शिल्पकार असे सांगून टाकले. असे करताना त्यांनी पाटण तालुक्यातील भाषणात प्रथमच धाडसी पाऊल टाकत थेट बाळासाहेब देसार्इंच्या कारकिर्दीचे पोस्टमार्टम केले. पवारांच्या या गुगलीमुळे पाटणच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
पाटण येथे झालेल्या कार्यक्रमात विक्रमसिंह पाटणकर यांच्या २६ वर्षांच्या राजकारणातील ‘विकासाचा सुवर्णकाळ’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांनी केले. त्यामुळे साहजिकच विक्रमसिंह पाटणकर राजकीय पूर्णविराम घेणार असे संकेत मिळाले. तर दुसरीकडे सत्यजित पाटणकर यांच्याकडून राष्ट्रवादीच्या अपेक्षा वाढलेल्या दिसल्या. विक्रमसिंह पाटणकर यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे सर्टिफिकेट त्यांच्या नेत्यांनी देणे, हे क्रमप्राप्त होते.
मात्र, असे करताना त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी बाळासाहेब देसाई यांच्या कार्यकिर्दीबाबत उणिवा शोधावे, हे शरद पवारांच्याशिवाय कुणी करू शकत नाही. त्यामुळे आलेली संधी ओळखून शरद पवार यांनी बाळासाहेब देसार्इंचे नाव न घेता टीका केली.
पवार म्हणाले,‘यशवंतराव चव्हाण यांच्या नंतरचे नेतृत्व म्हणून पाटणच्या नेतृत्वाचा लौकिक होता. १९५२, ६७, ७२, १९७७, ८३ या सालांपर्यंत पाटणच्या जनतेकडे राज्याची सत्ता होती. परंतु त्यानंतरही सुमारे १५० गावांना वीज मिळाली नव्हती. रस्ते नव्हते. लोक मैलन्मैल चालत येत होते. त्यानंतर मग आम्हीच काहीतरी बदल केला पाहिजे म्हणून विक्रमसिंह पाटणकरांना राजकारणात आणले. पाटणचे खरे शिल्पकार हे विक्रमसिंह पाटणकर आहेत, असे पवार यांनी सांगितले.
पवारांच्या या राजकीय खेळात विक्रमसिंह पाटणकर हिरो ठरले आहेत. तर दुसरीकडे सत्यजित पाटणकर यांनी आता पाटणकर गटाची धुरा खांद्यावर घेऊन आक्रमक व्हावे. पुढे काय करायचे ते बघू,’ असा सल्ला शरद पवार यांनी दिला. (प्रतिनिधी)


रामराजेंनी नातेसंबंध असल्याची पुष्टी जोडली
विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पाटणमध्ये बोलायचे म्हणजे माझी अडचण होते. कारण देसाई-पाटणकर घराण्यांशी माझे नातेसंबंध आहेत. त्यामुळे कोणाला गोंजरायचं आणि कोणाला दुखवायचं, असा प्रश्न पडतो; पण विधानसभेत असताना पाटणचा प्रश्न उपस्थित करण्याची तळमळ मला विक्रमसिंह पाटणकर यांच्यात दिसली.’
आम्ही केलेल्या रस्त्यावरून जाऊन शंभूराज देसाई गावागावांत आमच्या विरोधात बोलतात. आम्ही उभ्या केलेल्या सभामंडपात सभा घेतात. नळ योजनेचे पाणी पितात, असा टोला माजी विक्रमसिंह पाटणकर यांनी लगावला. तर आता रस्ते मी केलेत; परंतु त्या रस्त्यातील खड्डे मुजविण्याचे काम तरी करा, अशी अपेक्षाही पाटणकरांनी व्यक्त केली.

Web Title: Discussion of Pawar's googly in Patan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.