अतिवृष्टीमुळे वाई तालुक्यातील पिकांवर रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 02:21 PM2019-08-20T14:21:45+5:302019-08-20T14:22:51+5:30
सततच्या पावसामुळे वाई तालुक्यातील विविध पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याकरिता महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील शास्त्रज्ञ यांनी विठ्ठलवाडी, ता. वाई येथील भात पिकाची पाहणी केली.
वाई : सततच्या पावसामुळे वाई तालुक्यातील विविध पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याकरिता महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील शास्त्रज्ञ यांनी विठ्ठलवाडी, ता. वाई येथील भात पिकाची पाहणी केली.
या भागातील भात पिकावर करपा व कडा करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रांपिकोनोझॉईल २५ ई. सी २. ५० ग्रॅम प्रति लिटर पाणी व स्टेपोसोसायक्लिन ५ गॅ्रम प्रति पंप याप्रमाणे फवारणी करण्यात यावी. तसेच पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी भात लागणीवेळी पालाशयुक्त खते वापरण्यात यावीत. तसेच यावेळी तज्ज्ञांच्या वतीने पसरणी, शहाबाग, कणूर येथील आले व हळद पिकांची पाहणी केली असता आले व हळद पिकांमध्ये कंदकुज आढळून आली.
कंदकुज नियंत्रणासाठी ट्रायकोर्डमा ५ किलो प्रति एकरी शेणखतांमध्ये मिसळून वापरावा. तसेच वाई तालुक्यातील इतर गावांमध्ये वरील पिकांवरील प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकरी बांधवांनी वरील शिफारशीप्रमाणे उपाययोजना कराव्यात, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे वरिष्ठ शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार, संग्राम पाटील, मंडल कृषी पर्यवेक्षक माणिक बनसोडे, कृषी सहायक सुनील चौैधरी व शेतकरी उपस्थित होते.