महापुरात रुग्ण नदीकाठीच गतप्राण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:01 PM2019-08-18T23:01:12+5:302019-08-18T23:01:20+5:30
रवींद्र माने। लोकमत न्यूज नेटवर्क ढेबेवाडी : नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार असलेल्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात संततधार पावसाच्या तडाख्याने ...
रवींद्र माने।
लोकमत न्यूज नेटवर्क
ढेबेवाडी : नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार असलेल्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात संततधार पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले. कुठे पूल तुटले, तर कुठे घरे उद्ध्वस्त झाली. एके ठिकाणी वांग नदीकाठची पेटती चिताही पुरातून वाहून गेली.
हौदाचीवाडी-जिंती येथील एकाला पुराच्या पाण्याने अडवून ठेवल्याने ओढ्याकाठीच उपचाराविना जीव गमवावा लागला. एकेकाळी गावांचे संरक्षण करणाऱ्या डोंगरांनीही धीर सोडल्याने गुढे आणि उमरकांचन येथील गावकऱ्यांचा प्रवास जीव मुठीत घेऊन चालू आहे.
कधी वादळ, कधी भूकंप, कधी पाऊस तर कधी दुष्काळ. अशा विळख्यात सापडलेल्या ढेबेवाडी विभागातील सुमारे साठ गावांसह दोनशेहून अधिक वाड्यावस्त्यांंतील जनता आपला जीवन प्रवास करत आहे. वाल्मिकी पठाराला मिनी महाबळेश्वर म्हणून संबोधले जाते. मात्र यंदा पावसाने हाहाकार माजवल्याने पठारावरील पुलांसह रस्तेही वाहून गेले. येथील जनता संपर्र्कहीन झाली आहे.
सलग सोळा दिवस काढणे येथील पूल पाण्याखाली गेल्याने आणि त्यामध्ये हा पूल अर्धा वाहून गेल्याने येथील दळणवळणच थांबले आहे. काढणे परिसरातील शेतकºयांची पावसाने दैना उडविल्याने संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाली आहेत.
गुढे गावातील बडेकर वस्तीलगत असलेल्या वनविभागाच्या डोंगरकड्यांनी जनतेची झोपच उडवली आहे. वस्तीलगत असलेल्या डोंगरावर भलेमोठे दगड वर्षानुवर्षे वास्तव्य करत आहेत. मात्र यावर्षी झालेल्या पावसाने त्या दगडांचाच मातीचा आधार वाहून गेल्याने आता अनेक वर्षे साथीदार बनून राहिलेले दगड कधी वैर बनतील हे सांगता येत नाही. याठिकाणी नेहमीच वर्दळ असल्याने प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिंती जितकरवाडीतील जनतेने तर आतापर्यंत खूप सहन केले. येथील नजीकच्या ओढ्यावरील पुलाचे स्वप्न यावर्षी पूर्णही झाले. मात्र पहिल्याच पावसात साकव वाहून गेल्याने पुन्हा शिड्यांचा आधार घ्यावा लागला. कुठरे पवारवाडीनजीकचा पूलच वाहून गेल्याने जनतेचे हाल झाले.
पंधरा दिवस शाळेला दांडी...
विभागात सलग पंधरा दिवस पावसाने हाहाकार माजवला होता. शासनानेही याची दखल घेत शाळांना सहा दिवस सुटी जाहीर केली. मात्र त्यानंतर सुद्धा पूरपरिस्थिती आणि रस्तेच वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना पंधरा दिवस शाळेला दांडी पडली.
शंभराहून अधिक
घरांची पडझड...
ढेबेवाडी विभागात चिखल मातीच्या घरांची संख्या जास्त आहे. यावर्षी झालेल्या अतिपावसाने या घरांच्या भिंतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने शेकडो संसार भर पावसातही उघड्यावर होते.