बेवारस मृतदेहांचा होणार उलगडा !
By admin | Published: July 12, 2016 11:40 PM2016-07-12T23:40:11+5:302016-07-13T00:45:14+5:30
‘लोकमत’चा प्रभाव : पथक स्थापन
सातारा : वाढे फाटा परिसरात बेवारस मृतदेहांचा झोन बनत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनी अशा प्रकारच्या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी एक पथक स्थापन केले असून, हे पथक अशा बेवारस व्यक्तींचा उलगघडा आणि त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेणार आहे. त्यामुळे लवकरच वाढे फाटा परिसर आणि अन्य ठिकाणी सापडलेल्या बेवारस मृतदेहांची ओळख पटणार आहे.
आठवड्यातून एकदा तरी कुठे ना कुठे बेवारस मृतदेह पोलिसांना सापडतच असतो, त्यामुळे पोलिसांना त्याचे फारसे काही वाटत नाहीय; परंतु गेल्या दोन महिन्यांत वाढे फाटा परिसरात तब्बल पाचजणांचे बेवारस मृतदेह सापडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. एकाही मृतदेहाची आजपर्यंत ओळख पटली नसल्याने पोलिसांचा तपासही आता ‘बेवारस’ झालाय की काय, अशी शंका व्यक्त होऊ लागली होती.
सुरुवातीला मे महिन्यामध्ये एका पाण्याच्या डबक्यात पुरुषाचा विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळला होता. दुसऱ्या आठवड्यात त्याच ठिकाणाहून पाचशे मीटर अंतरावर एका स्त्रीचाही विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळून आला. एकापाठोपाठ दोन मृतदेह आढळले होते. काही दिवस उलटताच पुन्हा याच ठिकाणी आणखी तीन मृतदेह आढळले. त्यामुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र तो फोल ठरला. मात्र आता पोलिसांनी बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केल्याने सापडलेल्या मृतदेहांचीही ओळख पटणार आहे. (प्रतिनिधी)
मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याकडे वर्णनाची माहिती दिली जाते. तसेच मृतदेहाचे फोटो काढून पोलिस पाटील आणि पोलिस ठाण्यात दिले जातात. जेणेकरून मृतदेहाची ओळख पटविणे सोपे जाते.
- डी. एस. भोसले (हवालदार)