किळसवाण्या देहाला मिळाली ‘माणुसकीची झळाळी..’सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:27 AM2017-12-03T01:27:57+5:302017-12-03T01:30:32+5:30
सातारा : अनेक वर्षांपासून पुलाखाली राहणारा एक तरुण, दाढी वाढलेली, केस वाढलेले, अंगभर कपडेही नव्हते. एखादा मनोरुग्ण वाटावा असेच
सातारा : अनेक वर्षांपासून पुलाखाली राहणारा एक तरुण, दाढी वाढलेली, केस वाढलेले, अंगभर कपडेही नव्हते. एखादा मनोरुग्ण वाटावा असेच त्याचे हावभाव. हा तरुण साताºयातील एका व्यक्तीच्या नजरेस पडला आणि त्याचे रंगरूपच बदलून गेले.
शिरवळ येथील एका पुलाखाली एक तरुण गेल्या आठ वर्षांपासून वास्तव्य करीत होता. त्याचे केस वाढले होते. दाढीही वाढली होती. त्याच्या अंगात कपडेही नव्हते. पोटभर खायला मिळत नसल्याने तो शारीरिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत झाला होता. साताºयातील यशोधन ट्रस्टचे रवी बोडके यांना शुक्रवार दि. १ रोजी या तरुणाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने शिरवळ
गाठले.
प्रथमदर्शी तो तरुण मनोरुग्ण असावा, असा भास रवी बोडके यांना झाला. मात्र, तो निराधार होता. त्या तरुणाची झालेली दयनीय व केविलवाणी अवस्था पाहून बोडके यांचे मन हेलावले. ते तातडीने त्या तरुणाला आपल्यासोबत घेऊन साताºयातील यशोधन ट्रस्टच्या निवारा केंद्रात आले.
पोटभर जेवू, खाऊ घातल्यानंतर रवी बोडके यांनी तरुणाचे केस कापले, दाढी केली. त्याला स्वत:च स्वच्छ अंघोळ घातली. तसेच त्याला चांगले कपडेही दिले. आपले हे नवे रूप जेव्हा त्या तरुणाने आरशात पाहिले तेव्हा तो आनंदाने ढसाढसा रडू लागला. या तरुणाच्या चेहºयावरील हास्य पाहून मनाला समाधान लाभल्याचे रवी बोडके यांनी सांगितले.
अनेक वर्षे न बोलल्यानं तोंडातूून शब्द निघेना...
शिरवळ, ता. खंडाळा येथे आढळलेल्या संबंधित तरुणाने गेल्या सात ते आठ वर्षांपासून एकही शब्द उच्चारला नाही. त्यामुळे त्याला बोलताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तरुणाला बोलते करण्यासाठी निवारा केंद्राचे सर्वच सदस्य प्रयत्न करीत असल्याचे रवी बोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्याचबरोबर संबंधित तरुणाच्या चेहºयावरील हास्य पाहून समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
ज्यावेळी या तरुणाला निवारा केंद्रात आणले, त्यावेळी त्याच्या शरीरावर अनेक जखमा झालेल्या पाहावयास मिळाल्या होत्या. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर सुदैवाने त्याला कोणताही आजार नसल्याचे स्पष्ट झाले. सध्या तो काहीच बोलत नसला तरी आम्ही त्याला लवकरच बोलते करणार आहोत. एका निराधाराला आधार देऊ शकलो याचाच खूप मोठा आनंद आता होत आहे.
- रवी बोडके