दुभाजक ठरतोय कर्दनकाळ !
By admin | Published: September 11, 2016 11:47 PM2016-09-11T23:47:29+5:302016-09-11T23:47:29+5:30
आत्तापर्यंत ४ जणांचा बळी : महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष; तातडीने उपाययोजना करण्याची गरज
शिरवळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रिलायन्स इन्फ्रा व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या गलथान कारभारामुळे शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील चौपाळा जवळील एका रुग्णालयासमोर असलेला अनधिकृत रस्ता दुभाजक वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत चारजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगार वर्गाचे म्हणणे आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या माध्यमातून रिलायन्स इन्फ्राकडून सहापदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी सहापदरीकरणाचे काम होत असताना सारोळा पूल ते खंडाळा घाटापर्यंत मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी अनधिकृत रस्ता दुभाजक तयार केले असून, या अनधिकृत रस्ता दुभाजकामधून वाहनधारक जात असताना मोठ्या प्रमाणात लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामध्येच शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीमधील चौपाळाजवळील एका रुग्णालयासमोर असणारा अनधिकृत रस्ता दुभाजक हा अपघातांचे माहेरघर बनला आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्यांमध्ये जाण्याकरिता कामगारवर्ग अंदाजे तीन किलोमीटरवरील केसुर्डी फाट्यावरून फिरून शिरवळबाजूकडे यायला नको या उद्देशाने या अनधिकृत असणाऱ्या रस्ता दुभाजकामधून जात असताना सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष करत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. यामध्ये कामगारही जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष
दरम्यान, येथील रस्ता दुभाजक बंद करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी रिलायन्स इन्फ्रा व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना देऊनही त्यांच्या सूचनेकडेही संबंधितांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे याबाबत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडेही नागरिकांनी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनीही संबंधित अनधिकृत रस्ता दुभाजक बंद करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. मात्र या सूचनांनाही संबंधितांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.