स्वच्छतेची माहिती देणार दहिवडीतील बोलक्या भिंती : ग्रामस्थांची फलकातून जनजागृती, अनेक उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:52 PM2018-12-12T23:52:17+5:302018-12-12T23:52:57+5:30
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायतांनी जोरदार तयारी केली असून, १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अभियानात विविध ठिकाणी संदेश देणारे, लोकांना प्रोत्साहित करणारे
दहिवडी : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायतांनी जोरदार तयारी केली असून, १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अभियानात विविध ठिकाणी संदेश देणारे, लोकांना प्रोत्साहित करणारे डिजिटल फलक लावले असून, सार्वजनिक भिंतीवर स्वच्छतेचे संदेश देणारी माहिती चित्र रंगवली जात आहेत.
गेली दोन दिवस विटा तसेच स्वच्छतेचे संदेश देणारे पथनाट्य सादर करून दहिवडी परिसर ढवळून काढला आहे. महास्वच्छता अभियान होणार असून, हजारो हात पुढे येऊन सर्व परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार दहिवडीकरांनी केला आहे. यासाठी दहिवडीतील तब्बल ६० ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.
यासाठी स्वच्छता साफसफाई करण्यासाठी लागणारी सामग्री गोळा करण्याचे काम नगरपंचायतीने सुरू केले आहे. लोकांना जास्तीत जास्त साहित्य देण्याचा प्रयत्न केला आहे. जनजागृतीसाठी विविध संघटना, शाळा, रिक्षा संघटना प्रशासकीय कार्यालये पतसंस्था महिला बचतगट यांनाही अभियानात सामील करून घेण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कॉलेज, महाविद्यालय माध्यमिक शाळा, खासगी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांना स्वच्छतेची शपथ दिली आहे. महास्वच्छता अभियानाची जय्यत तयारी सुरू आहे.
दहिवडीकर सज्ज झाले पाच कोटी बक्षीस मिळविण्यासाठी..
स्वच्छतेमध्ये असणारा पाच हजार मार्कांचा पेपर प्रत्येक व्यक्तीला समजावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर करून स्वच्छतेचे अॅप डाऊनलोड करून या स्पर्धेची माहिती घरोघरी देण्याचे काम सुरू आहे. शहरातील सर्व मंडळी राजकीय गटातटाला फाटा देत दहिवडी शहरासाठी एकत्र येत असून, हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे.
संपूर्ण शहर स्वच्छतेबरोबरच आपला परिसर स्वच्छ ठेवणे, ओला, सुका कचरा वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करणे खतनिर्मिती करणे, सर्व कचरा घंटागाडीत टाकणे या दहिवडीच्या रोजच्या स्वच्छतेची तसेच ५००० मार्कांची पाहणी करणार आहे. दहिवडी नगरपंचायत पूर्ण क्षमतेने उतरून पाच कोटींचे बक्षीस मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे.