दीडशे वर्षांपूर्वीच्या साताऱ्यातील प्रबोधनाला उजाळा

By admin | Published: July 11, 2014 11:15 PM2014-07-11T23:15:21+5:302014-07-11T23:16:42+5:30

ऐतिहासिक ऋणानुबंध : मंगल मारुती-बदामी विहीर रस्त्यास राजा राममोहन राय यांचे नाव; उद्या नामकरण समारंभ

Disintegration in the Satara era of 150 years ago | दीडशे वर्षांपूर्वीच्या साताऱ्यातील प्रबोधनाला उजाळा

दीडशे वर्षांपूर्वीच्या साताऱ्यातील प्रबोधनाला उजाळा

Next



सातारा : सतीची चाल बंद करणारे राजा राममोहन राय यांच्या विचारधारेचे अनेक पाईक साताऱ्यात शे-दीडशे वर्षांपूर्वी कार्यरत होते. प्रबोधनाच्या या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंगल मारुती चौक ते बदामी विहीर या रस्त्याला राय यांचे नाव देण्याचा निर्णय झाला असून, नामकरण समारंभ येत्या रविवारी (दि. १३) होणार आहे. या निमित्ताने त्यांच्या ब्राह्मो समाजाचे पुरोगामी साताऱ्याशी असणारे ऐतिहासिक ऋणानुबंध अधोरेखित होत आहेत.
साताऱ्याचे प्रतापसिंंह महाराज (थोरले) हे राजा राममोहन राय यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते, याची आठवण फार कमी लोकांना असेल. प्रतापसिंह महाराजांनी राजघराण्यातील महिलांना शिक्षण देण्याबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राय यांच्या प्रेरणेनेच हाती घेतले. राय यांचा ब्राह्मो समाज एकेश्वरवादी संप्रदाय होता. मूर्तिपूजेस त्यांचा विरोध होता. हे विचार महाराष्ट्रात जसेच्या तसे आणणे त्याकाळी उचित न वाटल्याने ‘प्रार्थना समाज’ नावाने या चळवळीची मुहूर्तमेढ राज्यात रोवली ती महर्षी विठ्ठल रामजी शिंंदे, रामकृष्ण भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांनी. या समाजाची सातारा शाखा ‘सातारा सनातन प्रार्थना समाज’ या नावाने १८८६ मध्ये कार्यरत झाली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू सत्येंद्रनाथ हे त्यावेळी साताऱ्यात न्यायाधीश होते. त्यांनीच याकामी पुढाकार घेतला होता. कर्मवीर भाऊराव पाटील आणि रा. ब. काळे हे महर्षी शिंदे यांचे निकटचे स्नेही होते. कर्मवीरांच्या शाहू बोर्डिंगमध्ये (धनिणीची बाग) महर्षी शिंंदे, त्यांच्या भगिनी जनाक्का आणि इतर कार्यकर्ते प्रार्थना समाजाच्या कार्यासाठी एकत्र येत असत; बैठका होत असत. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अशा अनेक आठवणी सातारच्या इतिहासात कोरल्या गेल्या आहेत.
शाहू बोर्डिंगसमोरून जाणाऱ्या रस्त्याला राजा राममोहन राय यांचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांचे कार्य अद्यापही शहरात सुरू ठेवणाऱ्या ‘व्हिजन फाउंडेशन’ने १७ एप्रिल २०१२ रोजी पालिकेकडे केली होती. परंतु हा रस्ता खूपच लहान असून, प्रबोधनाच्या जनकाचे नाव काहीशा महत्त्वाच्या रस्त्यास देणेच उचित ठरेल, असा विचार पालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी केला. धनिणीची बाग अनंत इंग्लिश स्कूल रस्त्यापर्यंत विस्तारली आहे. या रस्त्यास राय यांचे नाव दिल्यास शाळेचे विद्यार्थी, शेजारीच असलेल्या शिवाजी उदय मंडळातील खेळाडू आणि शाहूपुरीकडे जाणाऱ्या नागरिकांना प्रेरणा मिळेल, असा विचार झाला आणि या रस्त्याची निवड करण्यात आली. रविवारी सकाळी ११ वाजता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नामकरण समारंभ होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत संभाजीराव पाटणे आणि किशोर बेडकीहाळ प्रमुख पाहुणे असून, नगरसेवक जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, मुक्ता लेवा आणि सुजाता गिरीगोसावी यावेळी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
ज्योत अजूनही प्रज्वलित
व्हिजन फाउंडेशनच्या माध्यमातून राजा राममोहन राय यांच्या जीवनपटाचे आणि विचारांचे अभ्यासक पंकज कुलकर्णी, प्रशांत मोरबाळे, नवनाथ पवार आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी प्रबोधनाची ज्योत प्रज्वलित ठेवली आहे. २२ मे रोजी राय यांच्या जयंतीनिमित्त नगर वाचनालय वाचक व्यासपीठाच्या सहकार्याने अभ्यासकांची व्याख्याने, २० आॅगस्ट रोजी ब्राह्मो समाज स्थापना दिनानिमित्त एखाद्या महाविद्यालयात कार्यक्रम, २७ सप्टेंबर रोजी राय यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाथाश्रम, बोर्डिंगमध्ये खाऊ व वस्तूवाटप, २३ जानेवारी रोजी संस्थेच्या स्थापनादिनानिमित्त आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात.

Web Title: Disintegration in the Satara era of 150 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.