पालिकेविषयी नाराजी : भीमाबाई आंबेडकर वसाहतीत आंदोलनाचे वारे
By Admin | Published: February 2, 2015 10:03 PM2015-02-02T22:03:40+5:302015-02-02T23:49:51+5:30
सध्या सार्वजनिक नळ कनेक्शन बंद केल्याने येथील वसाहतीत पाणीटंचाई भासू लागली आहे. नवीन चाळीतील घरे मिळेपर्यंत आमच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली होती
सातारा : सदर बझार येथील भीमाबाई आंबेडकर वसाहतीतील नागरिकांना मागील १५ दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी देऊनही पालिका दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
भीमाबाई आंबेडकर वसाहतीत जवळपास ८० पेक्षा जास्त कुटुंबे राहतात. त्यांना येथील सार्वजनिक नळातून हौदाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु सध्या सार्वजनिक नळ कनेक्शन बंद केल्याने येथील वसाहतीत पाणीटंचाई भासू लागली आहे. नवीन चाळीतील घरे मिळेपर्यंत आमच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली होती; परंतु मागील १५ दिवसांपासून याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. अखेर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आजमितीस येथील हातपंप व नगरपालिकेच्या सदर बझार येथील कार्यालयातून पाणी भरावे लागत आहे. रोजंदारी करून पोट भरणारे कामगार या वस्तीत सर्वाधिक असल्याने पाण्यासाठी पायपीट करून कामावर वेळेत जाणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे आम्हाला तातडीने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, सदर बझार परिसरातच जलवाहिनीला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. हे पाणी गटारांतून, रस्त्यावरून वाहत आहे. तेच पाणी नागरिकांना मिळाले, तरी बरे होईल, अशी भावना नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. एकीकडे लाखो लिटर पाणी वाया जात आहे आणि दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (प्रतिनिधी)