तीन तालुक्यांत ३७ टन कचऱ्याची विल्हेवाट
By admin | Published: April 1, 2015 09:59 PM2015-04-01T21:59:48+5:302015-04-02T00:48:54+5:30
‘धर्माधिकारी प्रतिष्ठान’ : हजारो कार्यकर्त्यांकडून ग्रामस्वच्छता अभियान
भुर्इंज : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या माध्यमातून वाई तालुक्यातील उडतरे, अनवडी तसेच जावळी ताुलक्यातील मेढा, कऱ्हाड तालुक्यातील दोन ठिकाणी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. या सर्व गावांमध्ये सुमारे ३७ टन कचरा जमा झाला. गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याची विल्हेवाटही करण्यात आली. वाई तालुक्यातील उडतरे येथे सुमारे साडेपाच टन तर अनवडीत पावणेसात टन कचरा गोळा करण्यात आला. या दोन्ही गावांतील सुमारे १६० श्रीसदस्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता.
या गावांतील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. ग्रामस्थांनी कचरा वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टरचीही सोय करून दिली. वाई तालुक्यातील गावांबरोबरच जावळी तालुक्यातील मेढा आणि कऱ्हाड तालुक्यातील कोळे, पापर्डे या ठिकाणीही ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला. वाई, जावळी आणि कऱ्हाड तालुक्यांतील ग्रामस्वच्छता अभियानातून सुमारे ३७ टन कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता अभियानात तीन्हीं तालुक्यातील श्रीसदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वच्छता अभियानास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळाला. (वार्ताहर)