श्रेयवाद उफाळला, दाढोलीत पाटणकर-देसाई गट आमने सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 05:35 PM2021-11-29T17:35:49+5:302021-11-29T17:38:55+5:30
दाढोली येथील जानाई देवी मंदिराच्या ओढ्यावरील साकवपुलाच्या कामावरून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद उफाळला. शिवसेना कार्यकर्त्यांनी सदर कामाचे थेट भूमिपूजन केल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
चाफळ : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीवरून मंजूरी मिळालेल्या चाफळ विभागातील दाढोली येथील जानाई देवी मंदिराच्या ओढ्यावरील साकवपुलाच्या कामावरून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद उफाळला. शिवसेना कार्यकर्त्यांनी सदर कामाचे थेट भूमिपूजन केल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संबंधित कामाच्या ठेकेदारास धारेवर धरत सदर काम कोणी मंजूर केले व ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता काम कसे सुरू केले याबाबत विचारणा करत सदरचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. यामुळे येथील वातावरण काही काळ तणावाचे बनले होते.
दाढोली ग्रामपंचायतीवर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाचे वर्चस्व आहे. जानाईदेवी मंदिराकडे जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीवरून खा. श्रीनिवास पाटील यांनी सुमारे 30 लाखाचा निधी मंजूर केला आहे. या कामाच्या भूमिपूजनाची तारीखही ठरविण्यात आली आहे. असे असताना देसाईगटाचे युवा कार्यकर्ते संभाजी डांगे यांनी गावातील काही अतिउत्साही कार्यकर्त्यांना सोबत घेवून खासदारांच्या प्रयत्नातून मंजूर कामाचे श्रेय घेण्यासाठी ठेकेदाराला हाताशी धरीत कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांशिवाय परस्पर भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्याचा खटाटोप केला. मात्र हा प्रकार राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी जाग्यावर जाऊन सदरचे काम बंद पाडले.
नुकत्याच झालेल्या जिल्हा बँके निवडणुकीतील गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या पराभवाने खचलेल्या विभागातील काही ज्येष्ठ नागरीकांनी नैराश्येतून दाढोली गावात वाद पेटवून दिल्याची चर्चा गावात सुरु आहे.
दाढोली ता.पाटण येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अथक प्रयत्नातुन मंजुरी मिळालेल्या साकव पुलाच्या कामाचे फुकटचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक ठेकेदाराच्या संगनमताने करत आहेत. माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर, खासदार श्रीनिवास पाटील, माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामे मार्गी लागलेली आहेत. यापुढील काळातही अशीच विकास कामे केली जाणार आहेत. त्यामुळे विरोधकांनी आम्ही मंजूर केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा जसाश तसे उत्तर दिले जाईल. - प्रकाश पवार, माजी उपसरपंच, दाढोली.