वाद मिटला पाहिजे, सर्व ठिकठाक होईल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:55 PM2018-04-27T23:55:25+5:302018-04-27T23:55:25+5:30
प्रमोद सुकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता म्हणे. अंतर्गत संघर्षाचे ग्रहण असूनही त्याला फारसा फरक पडला नाही. मात्र, राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष नंबर एक बनला. सेनेनेही उचललेलं शिवधनुष्य थोडसं पेललं.
आता तर भाजपही कमळ फुलवू पाहतंय. अशा सर्व परिस्थितीत काँग्रेसला जिल्ह्यात गतवैभव आणायचे असेल तर अंतर्गत वाद मिटला पाहिजे. मग सर्वकाही ठिकठाक होईल, असा साक्षात्कार नेत्यांना झालेला दिसतोय. या संदर्भातील पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील-उंडाळकर यांची ताजी वक्तव्ये बरंच काही
सांगून जातात. त्याच्यावर सध्या जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू
आहे.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण बाबा गट व काका गट हा तसा खूप जुना वाद आहे. त्याला अनेक कारणांची फोडणी मिळाल्याने हा वाद वाढतच गेला आणि परिणामी त्याचा फटका जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाला बसला, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आज तर जिल्ह्यात काँगे्रसचे फक्त दोनच आमदार दिसतात. ती संख्या वाढवायची असेल तर जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत वाद मिटणे गरजेचे आहे.
त्या अनुषंगाने पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना कºहाड दक्षिणमधून माझी उमेदवारी हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय होता. तो समजून घ्यायला हवा होता, असे सांगत जिल्ह्यात काँग्रेस बळकट करण्यासाठी आधी कºहाड दक्षिणेतील बाबा-काका गट हा वाद मिटला पाहिजे, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. तर पोतले येथील कार्यक्रमात माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी मी आगामी विधानसभेची निवडणूक लढणार नाही; पण काळजी करू नका.
सगळे काही ठिकठाक होईल, असा जाहीर सभेत विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे बाबा-काका गटांतील वाद मिटून नजीकच्या काळात जिल्ह्यात काँगे्रस ठिकठाक होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
काकींनीच दिली काकांना उमेदवारी
प्रेमिलाताई चव्हाण १९८४ मध्ये इंदिरा काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनीच पहिल्यांदा विलासराव पाटील-उंडाळकर यांना कºहाड दक्षिणमधून विधानसभेची उमेदवारी दिली, असे सांगितले जाते. त्यानंतर अनेक वर्षे प्रेमिलाताई काकी व विलासराव काका यांच्यात सलोख्याचे संबंध होते.
... तर अटीतटीचा सामना झाला असता
वास्तविक, १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विलासराव पाटील-उंडाळकर हे एस काँग्रेसमधून आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात इंदिरा काँग्रेसचे उमेदवार उभे होते बाळासाहेब शेरेकर. वास्तविक, त्यावेळी जयवंतराव भोसले यांनीही उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी का नाकारली याबाबत आजही उलट-सुलट मते मांडली जातात. उंडाळकरांच्या विरोधात रेठरेकर उमेदवार असते तर ती निवडणूक अटीतटीची झाली असती.
यापूर्वीही झाला होता वाद मिटविण्याचा प्रयत्न
पृथ्वीराज चव्हाण यांची राज्याच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर ही बाब उंडाळकरांना साहजिकच पचनी पडणारी नव्हती. त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार असल्याने तेच कºहाड दक्षिणमधून लढणार, हे स्पष्ट झाले होते. त्यावेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या माध्यमातून हा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न झाला होता. मात्र, त्याला यश आले नाही.
पुन्हा एकदा प्रयत्न सुरू
राज्यात व देशात जातीवादी पक्षाला रोखण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्रित यावे, असा राग आळवला जात आहे. त्यामुळे समविचारी पक्षांची मोट बांधत असताना काँगे्रसअंतर्गत मतभेदही मिटले पाहिजेत, अशा सूचना दिल्या गेल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना होमपीचवरील वादही मिटविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. शिवाय उंडाळकरही काँग्रेस विचारधारेपासून दूर गेलेले नाहीत. हे त्यांनी गत सहा महिन्यांत सुशीलकुमार शिंदे व शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या घेतलेल्या कार्यक्रमांवरून स्पष्ट होते. साहजिकच या साऱ्या बाबी बाबा व काका यांच्यातील वाद मिटविण्याचीच प्रक्रिया मानली जात आहे.