सातारा : आदर्की ग्रामपंचायतीच्या सरपंचासह तीन सदस्य अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 05:02 PM2021-11-15T17:02:37+5:302021-11-15T17:03:14+5:30
आदर्की- फलटण तालुक्यातील आदर्की बु॥ ग्रामपंचायतीच्या सरपंचासह तीन सदस्याची निवड अपात्र ठरविण्यात आली आहे. वेळेत जात पडताळणी कागदपत्रे सादर ...
आदर्की- फलटण तालुक्यातील आदर्की बु॥ ग्रामपंचायतीच्या सरपंचासह तीन सदस्याची निवड अपात्र ठरविण्यात आली आहे. वेळेत जात पडताळणी कागदपत्रे सादर न केल्याची तक्रार विकास काकडे यांनी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी ही कारवाई केली. या अपात्रतेच्या कारवाईमुळे आदर्की बु॥ ग्रामपंचायतीतील राजकीय समिकरणे बदलणार असल्याचे चर्चा सुरु आहे.
आदर्की बुद्रक ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. यावेळी थेट सरपंचपदी चित्रा हणमंत काकडे व नऊ सदस्य निवडून आले होते. यात, अनुसुचीत जाती जमाती महिला प्रवर्गातुन चित्रा हणमंत काकडे, प्रभाग एक मधून नागरिकाचा मागास प्रवर्गातून धनाजी तुकाराम खराडे, प्रभाग दोन मधुन नागरिकांचा मागास महिला प्रवर्गातून मंदा आंनंदराव शेडगे, प्रभाग तीन मधुन अनुसुचीत जाती जमाती प्रवर्गातुन उज्वला सदाशिव कुचेकर या निवडून आल्या होत्या.
शासन निर्णयानुसार मागास वर्गीय राखीव जागेवर निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याने निवडून आले नंतर सहा महिन्याच्या आत जातवैद्यता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते. अन्यथा त्याचे सदस्यत्व रद्द होते. असे असताना आदर्की बुद्रुकच्या सरपंच व तीन सदस्यांनी आपली जात वैद्यता प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही. याबाबतची तक्रार विकास श्रीरंग काकडे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. या अर्जाची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.
अपात्र सरपंच व सदस्यांच्या नावावर कागदाची पट्टी
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, सदस्यांचा फलक आहे. मात्र ही कारवाई होताच अपात्र सरपंच व सदस्य यांच्या नावावर कागदाची पट्टी लावून झाकण्यात आली आहेत.