स्थायी समितीच्या सदस्यांना अपात्र ठरवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:17+5:302021-05-18T04:40:17+5:30
फलटण : फलटणमध्ये राजधानी टॉवर्स या व्यापारी संकुलमधील १ आणि २ नंबर गाळ्यामध्ये एका व्यावसायिकाने खिडकीच्या जागी ...
फलटण : फलटणमध्ये राजधानी टॉवर्स या व्यापारी संकुलमधील १ आणि २ नंबर गाळ्यामध्ये एका व्यावसायिकाने खिडकीच्या जागी शटर बसवून आणि दोन गाळ्यांमधील भिंत पाडून, बदल करीत दुकानाच्या पायऱ्या रस्त्यावर बांधून अतिक्रमण केले आहे. मूळ नकाशात बदल करून आणि या बदलाला स्थायी समितीने मंजुरी दिल्याने स्थायी समितीच्या सदस्यांना अपात्र ठरवावे आणि अतिक्रमण तोडून टाकावे, अशी मागणी नगरपालिकेतील विरोधी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
फलटण नगरपालिकेचे शेजारी नगरपालिकेने राजधानी टॉवर्स व्यापारी संकुल इमारत बांधली असून, यामधील गाळ्यांचे जाहीर लिलाव केलेले आहेत, यातील मेन रोडला चिकटून असलेला एक नंबरचा गाळा व त्याच्या शेजारील दोन नंबरचा गाळा दोन व्यावसायिकांनी लिलाव पद्धतीने घेतला आहे. दोन गाळ्यांमधील भिंत त्याने पाडून टाकली आहे. मूळ गाळाधारकाने ज्या किमतीने लिलाव घेतला, त्याची संपूर्ण डिपॉझिट रक्कमही भरलेली नाही, तसेच मूळ गाळ्यांमध्ये बदल करून रस्त्याकडेला त्याचे दार काढताना या गाळ्यांच्या पायऱ्या रस्त्यावर आणल्या आहेत. नगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यात बदल करता येत नसतानाही त्या व्यावसायिकांनी बदल करून अतिक्रमण केल्याने आणि या बदलाला नगरपालिकेच्या स्थायी समितीत बैठकीमध्ये परवानगी दिल्याने स्थायी समितीचे सदस्य असणाऱ्या नगरसेवक व अधिकाऱ्यांना तातडीने अपात्र करावे तसेच अतिक्रमण केलेल्या पायऱ्या पाडून टाकाव्यात, गाळ्याच्या दर्शनी भागात बदल केल्याने आता गाळ्याच्या मूल्य बाजारभावाने वाढले आहे. त्यामुळे या गाळ्याचा केलेला लिलाव रद्द करून पुन्हा याचे लिलाव करावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून, त्यांनी दखल न घेतल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा अशोकराव जाधव यांनी दिला आहे.