प्रणयक्रीडेतील व्यत्यय ठरला आजीसाठी जीवघेणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:48 AM2021-09-16T04:48:56+5:302021-09-16T04:48:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : सत्तरीकडे झुकलेल्या आजीबाई गावात मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. कधी हाताला ...

Disruption in romance turned out to be fatal for grandmother! | प्रणयक्रीडेतील व्यत्यय ठरला आजीसाठी जीवघेणा!

प्रणयक्रीडेतील व्यत्यय ठरला आजीसाठी जीवघेणा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : सत्तरीकडे झुकलेल्या आजीबाई गावात मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. कधी हाताला काम नसलं तर आजीबाई कुणाचा तरी दरवाजा ठोठावून आपली भूक भागवत होत्या. त्या दिवशी पण असंच झालं. भूकेनं व्याकूळ झाल्या म्हणून त्यांच्या घरापासून काहीअंतरावर असलेल्या एका घराजवळ जाऊन त्यांनी दरवाजा ठोठावला. अन् इथच आजीचा घात झाला. आजीनं दरवाजा ठोठावल्याने माळकरी व भजन करणाऱ्याची प्रणयक्रीडा भंग पावली. त्यामुळे माळकऱ्याने निर्दयपणे आजीचा जीव घेतला. या धक्कादायक घटनेचा उलगडा वडूज पोलिसांनी केला असून, यामुळे समाजमन हेलावून गेलंय.

हिराबाई दगडू जगताप (वय ७० ) यांचे मूळ गाव खटाव तालुक्यातील ऐनकूळ. पण त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या येलमरवाडीमध्ये वास्तव्यास आल्या. त्या साफ सफाई करू लागल्यामुळे एका व्यक्तीने आजीला छोटंस घर राहायला दिलं. शेजारी-पाजाऱ्यांची छोटी-मोठी कामे करून त्या आपल्या दोनवेळच्या अन्नाची व्यवस्था करत होत्या. गावात त्यांचा कोणालाच त्रास नसायचा. दादा, ताई, माई म्हणत त्या एक एक दिवस आयुष्य पुढे ढकलत होत्या. पण रविवारची रात्रं त्यांची अखेरची ठरली. गावातीलच बाळकृष्ण पोळ यांच्या घरासमोर त्या मृतावस्थेत

गावकऱ्यांना दिसल्या. पोलिसांनी जेव्हा त्यांचा मृतदेह पाहिला तेव्हा

त्यांच्या डोक्यात खोलवर वार झालेले दिसले. कोणीतरी त्यांचा खून केला. हे निश्चित झालं. पोलिसांचा तपासही लगेच सुरू झाला. न विचारता मध्ये मध्ये बोलणारा बोलघेवडा माळकरी तुळशीराम बागल पोलिसांना खटकला अन् इथच त्याच्यावर दाट संशय बळावला. पोलिसांच्या स्टाइलने त्याला पोलिसांनी क्षणातच बोलतं केलं. तेव्हा त्याच्या कबुली जबाबाने पोलीसही अवाक तर झालेच शिवाय पोलिसांचं मनही हेलावून गेलं.

चाैकट : तपासात काय समोर आलं..

तुळशीराम सखाराम बागल (वय ४९, रा. येलमरवाडी, ता. खटाव) हा तसं पाहिलं तर माळकरी अन् भजनामध्ये रस असलेला. पण भजन करता करता तो एका महिलेच्या प्रेमात पडला. रविवारी, दि. १२ रात्री आठ वाजता तुळशीराम हा एका महिलेच्या घरात गेला. संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती घरात एकटीच होती. दोघेही प्रणयक्रीडेत मग्न असतानाच दरवाजावर थाप पडली. तुळशीरामच्या हृदयात धस्स झालं. त्यानं दरवाजा उघडला तर बाहेर सत्तर वर्षांच्या आजी हिराबाई दिसल्या. रागाच्या भरातच आजीला त्यानं घरात ओढून काठीनं डोक्यात वार केले. त्यामुळे क्षणातच आजी रक्तबंबाळ होऊन निपचित पडली. भेदरलेल्या तुळशीरामनं आजीचा मृतदेह उचलून एका घरासमोर ठेवला अन् आपण नामानिराळे आहोत, हे दाखवू लागला. पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून तो मात्र, सुटला नाही.

चाैकट : तिनं म्हणे, रक्त पुसलं..

संबंधित महिलेच्या घरातच हा क्रूर डाव साधला गेला. आजीच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने घरात रक्त सांडलं होतं. हे रक्त कोणाला दिसू नये म्हणून त्या महिलेनं रक्ताचे डाग धुऊन टाकले. हे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेलाही तुळशीरामसोबत अटक केलीय. दोघेही सध्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत.

Web Title: Disruption in romance turned out to be fatal for grandmother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.