राज्यातील 835 कंत्राटी डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 01:21 AM2021-05-05T01:21:55+5:302021-05-05T01:23:36+5:30
‘एमबीबीएस’ अर्हताधारकांची नेमणूक; ‘बीएएमएस’ वैद्यकीय अधिकाऱ्यांना थेट घरचा रस्ता
संजय पाटील
कऱ्हाड (सातारा) : राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गत दोन वर्षांपासून रुग्णसेवा केली, त्याच ८३५ डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर आले आहे. कंत्राटी पद्धतीने नेमणूक असलेल्या या डॉक्टरांना कार्यमुक्त करून त्याठिकाणी ‘एमबीबीएस’ अर्हताधारकांची नेमणूक करण्याचा घाट घालण्यात आला आहे. हे करताना त्या कंत्राटी डॉक्टरांच्या कोरोनातील योगदानाचा कसलाही विचार केला जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
राज्यात जून २०१९ पर्यंत बीएएमएस अर्हताधारक डॉक्टर हे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अस्थायी वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना स्थायी पद देऊन सेवेत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त झाली. परिणामी, आरोग्यसेवा कोलमडली. या कालावधीत रिक्त पदी एमबीबीएस अर्हताधारक उमेदवार मिळत नसल्याने अशा ठिकाणी गट अ पदावर बीएएमएस अर्हताधारकांची कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.
जुलै २०१९ मध्ये या नेमणुका झाल्या. त्यानंतर मार्च २०२० पासून राज्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाला. या महामारीत बीएएमएस अर्हताधारक कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली आहे. सध्याही बहुतांश बीएएमएस डॉक्टर्स कोरोना ड्यूटीत कार्यरत आहेत. मात्र, अशातच एमबीबीएस बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती देऊन कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी नोकरी जाण्याच्या चिंतेने ग्रासले आहेत. कोरोना काळात या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याने रुग्णालयांवरील ताणही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.